पतंग उडविण्याच्या वादातून युवकास बेदम मारहाण…विटा फेकून मारल्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रविवार कारंजा भागातील गंगावाडीत पतंग उडविण्याच्या वादातून एका युवकास टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत विटा फेकून मारण्यात आल्याने युवक जखमी झाला असून याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात चार जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या मााहितीनुसार अवधूत जाधव, रोशन गांगुर्डे व अन्य दोन तरूण अशी युवकास मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. याबाबत संकेत किरण शेटे (२८ रा. यशोमंगल सोसा.गंगावाडी) यांनी फिर्याद दाखल केले आहे. शेटे सोमवारी (दि.१५) आपल्या राहत्या सोसायटीच्या टेरेसवर पतंग उडवित असतांना ही घटना घडली. संशयित पतंग उडवित असतांना आरडाओरड करीत होते. त्यामुळे शेटे यांनी त्यांना आरडाओरड करू नका असा सल्ला दिल्याने ही हाणामारी झाली. संतप्त टोळक्याने शेटे यांना शिवीगाळ व दमदाटी करीत विटा फेकून मारल्या. या घटनेत शेटे जखमी झाले असून अधिक तपास हवालदार भागून करीत आहेत.
मखमलाबाद शिवारात घरफोडी
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मखमलाबाद शिवारात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सोन्याचांदीच्या दागिण्यांसह सिलेंडर टाकीवर डल्ला मारला. या घटनेत सुमारे १७ हजाराचा ऐवज चोरट्यांनी लांबविला असून याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे.
पुष्पा डोंगरसिंग महाले (रा.नागोबा टेकडी,मानकर मळा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. महाले कुटुंबिय रविवारी (दि.१४) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी महाले यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून ही चोरी केली. घरात शिरलेल्या चोरट्यांनी कपाटातील सोन्याचांदीचे दागिणे व गॅस सिलेंडर असा सुमारे १७ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार फुगे करीत आहेत.
तडिपारास पोलिसांनी ठोकल्या बेड्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गुन्हेगारी कारवायामुळे हद्दपारीची कारवाई केलेली असतांना शहरात वावर ठेवणा-या तडिपारास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. शहर गुन्हेशाखेच्या युनिट १ च्या पथकाने ही कारवाई गोल्फ क्लब मैदान भागात केली असून याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरूण मारूती कांबळे (३२ रा.राजदूत हॉटेल मागे,गोल्फ क्लब मैदान झोपडपट्टी) असे अटक करण्यात आलेल्या संशयित तडिपाराचे नाव आहे. कांबळे याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे शहर पोलिसांनी त्याच्याविरोधात हद्दपारीची कारवाई केलेली आहे. शहर आणि जिह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार केलेले असतांना त्याचा वावर शहरातच होता. पोलीस त्याच्या मागावर असतांनाच सोमवारी (दि.१५) तो आपल्या घरी आला असल्याची माहिती युनिट १ च्या पथकास मिळाली. युनिटचे वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा लावला असता तो पोलीसांच्या जाळय़ात अडकला. याबाबत अंमलदार अमोल कोष्टी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस दप्तरी गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार सोनार करीत आहेत.