इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय निवडणूक आयोगाने मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगाना आणि मिझोराम या पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. आज मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडेय, अरुण गोयल यांनी पत्रकार परिषद घेऊन या निवडणुकांविषयी माहिती दिली.
या घोषित झालेल्या निवडणुकांमध्ये मिझोराममध्ये ७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. छत्तीसगडमध्ये ७ नोव्हेंबर आणि १७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मध्यप्रदेशातही १७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तेलंगनात ३० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी राजस्थानमध्ये मतदान होणार आहे. ३ डिसेंबरला या सर्वांचे निकाल घोषीत होणार आहे.
या पत्रकार परिषदेत या पाच राज्यात विधानसभेच्या ६७९ जागा असून १६ कोटी १४ लाख मतदार आहे. त्यात ८.२ कोटी पुरुष, ७.८ कोटी महिला आणि ६०.२ लाख नवोदित मतदार आहेत, असं राजीव कुमार यांनी स्पष्ट केलं. पाच राज्यात महिला मतदारांची संख्या वाढली असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राजकीय पक्षांनी ३१ ऑक्टोबरपर्यंत त्यांना मिळणाऱ्या निधीची यादी द्यावी, अशा सूचनाही दिल्या. निधीची माहिती मिळाल्यावरच टॅक्समध्ये सूट देण्यात येईल. तसेच निवडणूक काळातील खर्चाचा तपशील देणं सर्वच उमेदवारांवर बंधनकारक असणार असल्याचेही ते म्हणाले.
राज्यात या विधानसभेच्या ६७९ जागा असून १६ कोटी १४ लाख मतदार आहे. त्यात मध्य प्रदेशात विधानसभेच्या २३० जागा, राजस्थानमध्ये एकूण २०० जागा आहेत, छत्तीसगडमध्ये ९० जागा आहेत, तेलंगनात ११९ जागा आहेत. मिझोरामध्ये ४० जागा आहेत. या पाचही राज्यापैकी दोन राज्यात काँग्रेसची सत्ता असल्यामुळे काँग्रेसाठी ही निवडणुक महत्त्वाची आहे. तर भाजपलाही आपले गड कायम ठेऊन काँग्रेसच्या हातून सत्ता खेचण्याची या निवडणुकीत संधी आहे.