नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहर परिसरात सोमवारी वेगवेगळया भागात राहणा-या चौघांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यातील दोघांनी विषारी औषध सेवन करून तर दोघांनी गळफास घेऊन जीवन संपवले. याप्रकरणी देवळाली कॅम्प,म्हसरूळ,गंगापूर व अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पहिली घटना मखमलाबाद येथे घडली. सुनिल विठ्ठल पारधी (रा.सिध्दार्थ नगर राजवाडा,मखमलाबाद) यांनी सोमवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. ही घटना निदर्शनास येताच कुटुंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास हवालदार गवारे करीत आहेत. दुसरी घटना औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात घडली. संदिप गणेश पांडे (३५ रा.इंदिरा गांधी शाळेजवळ ,शिवाजीनगर) यांनी सोमवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील हॉलमध्ये पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच भाऊ संतोष पांडे यांनी त्यांना तात्काळ जिल्हारू ग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक हिंडे करीत आहेत.
तिसरी घटना सिडकोतील साईबाबानगर भागात घडली. प्रशांत धोंडीराम आहेर (४० रा.महाकाली रोड मोरवाडी) यांनी सोमवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील किचनमध्ये पंख्याच्या हुकास साडी बांधून गळफास लावून घेतला होता. कुटूंबियांनी त्यांना तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल केले असता डॉ. जयजी उगले यांनी त्यास तपासून मृत घोषीत केले. याबाबत अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास हवालदार परदेशी करीत आहेत.
चौथ्या घटनेत शिंदे येथील सुनंदा विलास जाधव (४६) या गेल्या काही दिवसांपासून भगूर येथील विजयनगर भागात आपल्या नातेवाईकांकडे पाहूण्या म्हणून आल्या होत्या. सोमवारी रात्री त्यांनी अज्ञात कारणातून नातेवाईकांच्या घरातच विषारी औषध सेवन केले. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी तात्काळ कॅन्टोमेंट हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना डॉ. दौलतानी यांनी त्याना मृत घोषीत केले. याबाबत देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार गुंजाळ करीत आहेत.