नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी गंगापूर आणि सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिला अपघात औद्योगीक वसाहतीत झाला. शिवाजी विश्वनाथ झोटे (५६ रा.सातपूर) हे गेल्या शनिवारी (दि.१३) औद्योगीक वसाहतीतून आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. व्हिआयपी कंपनीकडून कार्बन नाक्याच्या दिशेने ते जात असतांना पाठीमागून भरधाव आलेल्या सिटी लिंक बसने दुचाकीस धडक दिली. या अपघातात झोटे यांचा मृत्यू झाला. याबाबत संदिप शेजूळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बसचालक भुषण बाजीराव ससले (३२ रा.साई प्रसाद अपा.बागुल ड्रायव्हींग स्कूल जवळ अशोकनगर ) यांच्याविरोधात सातपूर पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक कातकाडे करीत आहेत.
दुस-या अपघातात शरद भिमराव रोकडे (३५ रा.चांदशी ता.जि.नाशिक) हे गेल्या बुधवारी (दि.१०) रात्री आपल्या दुचाकीवर पाईपलाईनरोडने प्रवास करीत असतांना झाला होता. गंगापूररोड सिग्नल भागात एमएच १५ जेएच ७९९९ या भरधाव चारचाकीने दुचाकीस धडक दिल्याने रोकडे गंभीर जखमी झाले होते. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत हवालदार दशरथ सरनाईक यानी दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पवार करीत आहेत.