इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः एकीकडे मराठा आरक्षणासाठी मुंबईला धडकण्याची जोरदार तयारी सुरु असतांना दुसरीकडे सरकारचेही हा प्रश्न सुटावा यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहे. सोयऱ्यांनाही ओबीसी आरक्षणाचा फायदा द्यावा ही मागणी जरांगे पाटील यांनी केली होती. त्याची बरीच चर्चा झाली. पण, आता सरकार ही मागणी मान्य करण्यास तयार झाल्याचे बोलले जात आहे. या मागणीबरोबरच जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्यामुळे त्यांचे आंदोलन लवकरच संपण्याची चिन्हे आहेत.
सरकारचे शिष्टमंडळ आजच आंतरवली सराटीत जाऊन जरांगे यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळात आमदार बच्चू कडू, मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांचा समावेश आहे. जरांगे आणि आ. कडू यांच्या भेटीचा तपशील मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आला केला आहे. त्यानंतर मंत्र्यांमध्ये चर्चा झाली आणि मसुदा तयार करण्यात आला आहे. तो घेऊन शिष्टमंडळ जरांगे यांची अंतरवाली सराटीमध्ये भेट घेणार आहे. मराठा आरक्षण तोडग्याबाबत मुख्यमंत्री आणि माझी जवळपास चार तास चर्चा झाली. सगेसोयरे आणि अन्य मागण्यांवर चर्चा होऊन समाधानकारक तोडगा काढला आहे, अशी माहिती आ. बच्चु कडू यांनी दिली.
जरांगे पाटील यांना मुंबईला येण्याची वेळच येऊ नये, यासाठी राज्य सरकार युद्ध पातळीवर कामाला लागले आहे. मुख्यमंत्री ॲक्शन मोडवर आल्याने प्रशासकीय यंत्रणाही हलली आहे. जरांगे यांच्या शंभर टक्के मागण्या पूर्ण झाल्यामुळे आंदोलन मागे घेतले जाण्याची शक्यता आहे. कुणबी नोंद आढळलेल्या सोयऱ्यांनाही आरक्षण मिळणार आहे. विधी विभागाच्या सचिवांनी कायदेतज्ज्ञांना बोलवून सल्ला घेतल्याची माहिती आहे.