इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अयोध्येमध्ये श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त विविध धार्मिक विधिंना आजपासून सुरुवात झाली आहे. हे विधी २१ जानेवारीपर्यंत चालतील आणि त्यानंतर २२ जानेवारीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. आज दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी या प्राणप्रतिष्ठा विधी कार्यक्रमांना सुरुवात झाली असून २२ जानेवारी रोजी दुपारी एक वाजता हे विधी पूर्ण होतील. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांनी ही माहिती दिली.
२२ तारखेच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्यासह सर्व विश्वस्त आणि दीडशेहून अधिक संप्रदायांचे धर्मगुरू आणि विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याला श्रीराम मंदिर बांधणारे अभियंते आणि कारागीरही उपस्थित राहणार आहेत. प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला अंतिम स्वरूप देण्यासाठी २० आणि २१ जानेवारीला रामललाचं दर्शन बंद राहणार असल्याचंही चंपत राय यांनी सांगितलं
.https://www.youtube.com/live/uuOZHxo9OAg?si=5OuZV2dr8fpl9cVQ