मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथून प्रयाण झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न आहे. याकरिता महाराष्ट्राचे १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे योगदान असणार आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उद्योग आल्यास हे ध्येय पूर्ण होणार, असा विश्र्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांसोबत बोलताना व्यक्त केला.
मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक आली पाहिजे, महाराष्ट्राचे ब्रॅण्डिंग झाले पाहिजे, यासाठी दावोस येथे चांगली संधी आहे. आज जगभरातील लोक महाराष्ट्राकडे एका वेगळ्या अपेक्षेने पाहत असून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत. यावेळी मागील वर्षीपेक्षा जास्त प्रमाणात करार होऊन जास्तीची गुंतवणूक महाराष्ट्रात होईल. यामुळे प्रमुख शहरांसोबतच ग्रामीण भागातही अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. महाराष्ट्रात उत्तम पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ आणि उद्योगांसाठी सवलतीचे धोरण असल्याने दावोस येथील उद्योजक हे गुंतवणूक करण्यास तसेच उद्योग सुरू करण्यास आग्रही असल्याचेही त्यांनी सांगितले.
नवीन सरकार आल्याबरोबर महाराष्ट्र हे परकीय थेट गुंतवणुकीत नंबर १ क्रमांकावर आले आहे. गेल्या वर्षी या परिषदेत १ लाख ३७ हजार कोटींचे गुंतवणूक करार झाले होते. त्यापैकी ७६ टक्के करार प्रत्यक्षात आले आहेत. आता यापेक्षाही जास्त प्रमाणात महाराष्ट्रात गुंतवणुकीचे करार केले जातील, असेही प्रतिपादन मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी केले.
या परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत आणि १० लोकांचे शिष्टमंडळ यांचा समावेश आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारकडून ८ जणांच्या शिष्टमंडळाचा समावेश आहे.