इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणेः मुंबई विमानतळावर इंडिगो एअरलाईन्सचे प्रवासी विमानतळावर जमिनीवर बसून जेवण करत असतानाचा व्हिडीओ सध्या ‘सोशल मीडिया’वर व्हायरल होत असतांना दिल्लीतील एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. येथे दिल्लीला जाणारे इंडिगोचे विमान रद्द झाल्यामुळे प्रवाशी आक्रमक झाले असून एक जण कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावल्याचा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. या घटनेनंतर विमानतळावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये विमानाचा सह पायलट अनूप कुमारवर हल्ला करताना एक प्रवासी दिसत आहे. खराब हवामानामुळे उड्डाणाला विलंब होणार अशी वैमानिक घोषणा करत होता, त्यावेळी ही घटना घडली. या प्रकारानंतर सीआयएसएफने आरोपीला अटक करुन दिल्ली पोलिसांकडे सोपवले. सोमवारी संध्याकाळी आरोपी साहिल कटारियाला जामीन मंजूर करण्यात आला. दिल्ली पोलिसांनी साहिल विरोधात आयपीसीच्या गुन्हा नोंदवला आहे. अधिकाऱ्यांनी आरोपी साहिल कटारियाची सुटका केली.
दिल्लीतील हवामान खराब झाल्यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे. वैमानिकांना विमानांचे उड्डाण करणे शक्य नसल्याने विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांनी विमान फेऱ्या रद्द केल्या. यामुळे प्रवाशांनी विमानतळावरील कर्मचाऱ्यांना जाब विचारला. त्यातून हा गोंधळ झाला. विमान फेऱ्या का रद्द झाल्या, याचे कंपन्यांनी योग्य स्पष्टीकरण दिले नसल्यामुळे हा गोंधळ उडाल्याचे बोलले जात आहे.