नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– गुन्हेगारी कारवायांमुळे सहा महिन्यांसाठी हद्दपारीची कारवाई केलेली असतांना शहरात राजरोस वावरणा-या तडिपारास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई रविवार पेठेतील तेली गल्लीत करण्यात आली असून याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रसाद गजानन बु-हाडे (३१ रा.महादेव अपा.तेली गल्ली) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. बु-हाडे याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्यास शहर आणि जिह्यातून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी हद्दपार करण्यात आले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस त्याच्या मागावर असतांनाच रविवारी (दि.१४) रात्री तो आपल्या घरी असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने संशयित पोलिसांच्या हाती लागला. सरकारवाडा पोलिसांनी त्यास बेड्या ठोकल्या असून याबाबत अंमलदार राम बर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुह्याची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार अहिरे करीत आहेत.
७५ वर्षीय वृध्दाची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जेलरोड परिसरातील चंद्रश्वर नगर भागात राहणा-या ७५ वर्षीय वृध्दाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. वृध्दाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राजाराम बाबुराव केदार (रा.ड्रिम संकुल सोसा.चंद्रेश्वर नगर) असे मृत वृध्दाचे नाव आहे. केदार यांनी रविवारी (दि.१४) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील हॉलमध्ये छताच्या हुकाला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत सुनिल केदार यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.