नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्यानिमित्ताने नाशिक शहरात तो दिवस राष्ट्रीय सणासारखा साजरा करण्यात येणार आहे. त्याच अनुषंगाने २२ जानेवारी रोजी शिवसेना ठाकरे गटातर्फे नाशिक मधील काळाराम मंदिरात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आरती करण्यात येणार असल्याने त्यादिवशी ड्राय डे घोषित करावा तसेच चिकन व मटन विक्रीची दुकाने बंद ठेवावी व सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी. या आशयाचे निवेदन शिवसेना ठाकरे गटातर्फे जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहे.
शिवसेना ठाकरे गटातर्फे २२ जानेवारीला मंगलमय वातावरणात गोदातीरी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आरती सुद्धा करण्यात येणार आहे. यानिमित्त ठिकठिकाणी विद्युत रोषणाई तसेच दीप प्रज्वलित करण्यात येणार आहेत. त्यामुळेच या दिवशी ड्रायडे घोषित करणे गरजेचे आहे. सर्व चिकन व मटन विक्रीची दुकाने बंद ठेवावीत. सिडको आणि सातपूर परिसरातील अवैध मांस विक्रीच्या दुकानांवर कारवाई करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
त्या दिवशी सर्व शासकीय, निवशासकीय व खाजगी कार्यालयांना व शाळाना सुट्टी जाहीर करावी. कायदा व सुव्यवस्थेचा विचार करून महानगर परिसरात पोलीस गस्त वाढवावी. असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सदर निवेदन शिवसेना उपनेते सुनील बागुल, जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, दत्ता गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळासाहेब कोकणे,सुभाष गायधनी,शैलेश सूर्यवंशी,महानगर समन्वयक,देवा जधव,नीलेश साळुंके,सुनील जाधव,मसूद जिलानी,ईमरान तांबोळी,राजेंद्र वाकसरे,दीपक वाघ आदींनी दिले. नंतर या आशयाचे आणखी एक निवेदन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनाही देण्यात आले.
ही केली मागणी
प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी म्हणून नाशिकची ओळख आहे. २२ जानेवारीला अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर व प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या शुभ मुहूर्तावर अयोध्येप्रमाणेच नाशिक शहरात ठाकरे गटाकडून फटाक्यांची आतषबाजी, दीपोत्सव, विद्युत रोषणाई व राम मंदिरात आरती करून दिवाळी सारखा सण साजरा करण्यात येणार आहे. याकरता दस्तर खुद्द शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे नाशिकला येत असून काळाराम मंदिरात आरती करणार आहेत. याकरिता प्रशासनाने देखील हातभार लावावा. म्हणून निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात शहरातील मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्यात यावीत. ड्रायडे जाहीर करावा. तसेच शासकीय कार्यालय व शाळांना सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी. अशी मागणी नाशिक जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांना करण्यात आली आहे.
सुधाकर बडगुजर, महानगर प्रमुख ठाकरे, शिवसेना (ठाकरे गट)