मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय हवाई दलाने १४ जानेवारी रोजी मुंबईतील मरीन ड्राइव्ह येथे हवाई प्रात्यक्षिकांसह विविध उपक्रमांचा जनसंपर्क कार्यक्रम आयोजित केला होता. हवाई दलाबद्दल जागरुकता निर्माण करणे आणि भारतीय हवाई दल आणि स्थानिक समुदाय यांच्यातील संबंध अधिक दृढ करणे हा या जनसंपर्क कार्यक्रमाचा प्राथमिक उद्देश होता. हवाई दलाची कौशल्ये, क्षमता प्रदर्शित करणे, भारतीय हवाई दलाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि तरुणांना भारतीय हवाईदल करिअर म्हणून निवडण्यास प्रोत्साहित करणे हा देखील या कार्यक्रमाचा उद्देश होता. हा कार्यक्रम महाराष्ट्र सरकारच्या समन्वयाने आयोजित करण्यात आला होता.
नयनरम्य मरिन ड्राइव्हवर मुंबईकर भारतीय हवाई दलाच्या हवाई प्रात्यक्षिकांचे साक्षीदार झाले. अनेक हवाई तळांवरून उड्डाण करणारी विमाने या प्रात्यक्षिकांमध्ये सहभागी झाली होती. महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस हे प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते. अनेक नागरी आणि लष्करी मान्यवरही या कार्यक्रमात सहभागी झाले आणि हवाई प्रात्यक्षिकांचे साक्षीदार झाले.
हवाई कसरतींमध्ये भारतीय हवाई दलाच्या प्रात्यक्षिक चमूचा समावेश होता. गिरगाव चौपाटीवर एएन -३२ मधून आकाशगंगा चमूच्या हवाई योद्ध्यांनी स्कायडायव्हिंग म्हणजेच विमानातून जमिनीच्या दिशेने उडी मारत अचूक पद्धतीने उतरून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सूर्यकिरण चमूच्या प्रभावी हवाई प्रात्यक्षिकांनीही उपस्थितांना खिळवून ठेवले. सुखोई -३० एमकेआय आणि सारंग हेलिकॉप्टरच्या कालबद्ध आणि समक्रमित प्रात्यक्षिकांनी भारतीय हवाई दलाची उत्कृष्टता प्रदर्शित केली.