इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईत आता १५ ते १७ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी ) चे १४१ वे सत्र आयोजित करण्यात आले आहे. याला ऑलिम्पिक खेळ भारतात आणण्याच्या प्रयत्नांशी जोडले जात आहे. जेव्हा नीता अंबानी बीजिंगमध्ये ऑलिम्पिक सत्र आयोजित करण्यासाठी बोली लावत होत्या, तेव्हा भारताच्या बाजूने एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान होईल, असे कोणीही वाटले नव्हते. भारताला एकूण ७६ पैकी ७५ मते मिळाली होती.
आता प्रश्न असा आहे की आयओसीचे सत्र भारतात आले आहे. पण ऑलिम्पिक स्पर्धाही भारतात येणार का ? आयओसी सत्राचे आयोजन करताना नीता अंबानी म्हणाल्या होत्या, क्रीडा हा नेहमीच जगभरातील कोट्यवधी लोकांसाठी आशा आणि प्रेरणांचे प्रतीक आहे. आज आपण जगातील सर्वात तरुण देशांपैकी एक आहोत आणि मी ऑलीम्पिकच्या जादूशी तरुणांची ओळख करून देण्यासाठी उत्सुक आहे. याचे यजमानपदासाठी अत्यंत उत्साही आहे. येत्या काही वर्षांत भारतात ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करणे हे आमचे स्वप्न आहे.
नीता अंबानी भारतात ऑलिम्पिक आणण्याचे स्वप्न का पाहत आहेत आणि आयओसी सत्र इतके महत्त्वाचे का आहेत ? खरं तर, आयओसी सत्र हे ऑलिम्पिक खेळांबाबत निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था आहे. यामध्ये ऑलिम्पिक चार्टर स्वीकारणे किंवा त्यात सुधारणा करणे, आयओसी सदस्य आणि पदाधिकारी निवडणे आणि ऑलिम्पिकचे यजमान शहर निवडणे यांचा समावेश आहे. उदाहरणार्थ, ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याची चर्चा जोरात सुरू आहे आणि ३०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये त्याचा समावेश करण्याचा निर्णय घेतला गेला तर मुंबईतच आयओसीच्या अधिवेशनात त्याची घोषणा केली जाईल.
आयओसी सत्रादरम्यान भारताला भेट देणाऱ्या जगातील नामवंत क्रीडा व्यक्तिमत्त्वांची एक मोठी यादी आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख, जगातील सर्वात मोठी फुटबॉल संघटना, फिफा अध्यक्ष जियानी इन्फँटिनो, आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष सेबॅस्टियन को, मोनॅकोचा प्रिन्स अल्बर्ट दुसरा आणि पोल व्हॉल्ट चॅम्पियन येलेना इसिनबायेवा यांचा या यादीत समावेश आहे.
४० वर्षांपूर्वी १९८३ मध्ये, नवी दिल्लीने आयओसी सत्राच्या ८६ व्या आवृत्तीचे आयोजन केले होते. तेव्हापासून, भारताला ऑलीम्पिक सोडा आयओसी सत्राचे यजमानपद सुद्धा मिळाले नाही. अनेक पिढ्या खेळाडू ऑलिम्पिक भारतात येण्याची वाट पाहत आहेत, पण भारतात ऑलिम्पिक होऊ शकले नाही. कारण ऑलिम्पिक समितीमध्ये भारतासाठी आवाज उठवण्यासाठी एकही खाजगी सदस्य नव्हता. सहा वर्षांपूर्वी नीता अंबानी. आयओसीच्या पहिल्या भारतीय खाजगी महिला सदस्या बनल्या. त्यांच्या मेहनतीला फळ मिळाले आणि १४१ व्या आयओसी सत्राचे यजमानपद भारताकडे सुपूर्द करण्यात आले.
आणि हे फक्त आयओसीचे सदस्य असण्यापुरते नाही तर नीता अंबानी भारतीय खेळांचा चेहरामोहरा बदलत आहेत. आज २ कोटी १५ लाखांहून अधिक युवा खेळाडू त्यांच्या क्रीडा योजनांशी जोडले गेले आहेत. क्रीडा जगतात त्याच्या या अनोख्या उपक्रमाचा फायदा आशियाई क्रीडा स्पर्धेत पाहायला मिळाला. आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या १० टक्क्यांहून अधिक खेळाडू रिलायन्स फाऊंडेशनशी संबंधित आहेत.