इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
परभणी : पोखर्णी-पाथरी महामार्गावर सोनपेठ येथील पोलिस उपनिरीक्षकांची दुचाकी आणि स्कॉर्पिओची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात पोलिस उपनिरीक्षक जागीच ठार झाला. प्रभाकर मारोतराव गवारे (५६, रा. पाथरी) असे पोलिस अपघातात ठार झालेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे.
प्रभाकर गवारे हे रात्री परभणीहून सोनपेठकडे दुचाकीने जात होते. भारसवाडा येथे स्कॉर्पिओ आणि गवारे यांच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. त्यात गवारे हे बाजूला फेकले गेले. ते जागीच ठार झाले. काही वेळाने दोन्ही वाहनांना आग लागली. तीत दोन्ही गाड्या खाक झाल्या.
आग लागण्याअगोदरच स्कॉर्पिओ वाहनातील प्रवासी पसार झाले. सोनपेठ पोलिस ठाण्यात गवारे हे २०१९ मध्ये सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांची पदोन्नती झाली.