इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जालना – मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्याची रुपरेषा जाहीर केली. ते २० तारखेला आंतरवाली सराटी येथून निघणार आहेत. बीड, नगर, पुण्यामार्गे मुंबईत जाऊन प्रजासत्ताक दिनापासून आझाद मैदानात उपोषण करणार आहेत.
जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारविरोधात शड्डू ठोकला आहे. मुंबई आंदोलनाचा संपूर्ण मार्ग व रुपरेषा त्यांनी जाहीर केली. ते म्हणाले, की मुंबईतील आंदोलनासाठी २० जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता आंतरवाली सराटी येथून आहोत. मुंबईतील शिवाजी पार्क व आझाद मैदान ही दोन्ही मैदाने आंदोलनासाठी लागणार आहेत. २० जानेवारीला पहिला मुक्काम बीड तालुक्यातील शिरूर मातोरी येथे, दुसऱ्या दिवशी बारा बाभळी (ता. नगर) येथे दुसरा मुक्काम, २२ तारखेला रांजणगाव येथे तिसरा मुक्काम होईल. २३ जानेवारी रोजी पुण्याच्याच खराडी बायपास लगत चौथा व २४ जानेवारी रोजी लोणावळ्यात पाचवा, २५ जानेवारी रोजी नवी मुंबईच्या वाशीत सहावा मुक्काम होईल. २६ जानेवारीला मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन स्थळी पोहोचू.
पुण्याच्या मुक्कामाच्या वेळी आंदोलनात जवळपास एक कोटी मराठा बांधव सहभागी होतील, असा दावा जरांगे पाटील यांनी केला. मुंबईला येणाऱ्या समाजबांधवांनी खाण्यापिण्याच्या वस्तू बरोबर घ्याव्यात, त्यांनी वाहनाजवळच मुक्काम करावा, कुणीही व्यसन करू नये, असे आवाहन करून ते म्हणाले, की सर्वांनी स्वयंसेवक म्हणून काम करा. पाण्याचे टँकर सोबत घ्या. आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला, तर वेळीच त्याला पोलिसांच्या स्वाधीन करा, असे त्यांनी सांगितले.
आज जरांगे यांची प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी भेट घेतली. या वेळी जरांगे यांनी मुंबईला पोहोचल्यानंतर सरकारशी कोणतीही चर्चा होणार नसल्याचे जरांगे यांनी सांगितले.