नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शासकिय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवत भामट्याने दोघा वृध्द बहिणींचे अलंकार हातोहात लांबविल्याची घटना काठेगल्ली भागात घडली. या घटनेत रोकडसह दागिणे असा सुमारे ७३ हजार २०० रूपये किमतीचा ऐवज भामट्यांनी लांबविला असून याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शोभा गोविंद खांबेकर (६० रा.चव्हाटा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. खांबेकर व त्यांची वृध्द बहिण रविवारी (दि.१४) काठेगल्ली भागात गेल्या होत्या. नाशिक पुणे मार्गावरील जांदे सॉ मिल समोर त्या अॅटोरिक्षाची प्रतिक्षा करीत असतांना ही घटना घडली. रस्त्याच्या कडेला दोन्ही वृध्दा उभ्या असतांना दोघा अनोळखी भामट्यांनी त्यांना गाठले. यावेळी त्यांनी शासकिय योजनांची माहिती देत तुमचे अनुदान मंजूर करून देतो असा बहाणा करीत रोकडसह दोघींचे दागिणे लांबविले.
दोघी बहिणींचे फोटो काढण्याचा बहाणा करून संशयितांनी अंगावरील अलंकार पाकिटात काढून ठेवण्याचा सल्ला दिला. यावेळी बोलण्यात गुंतवून पाकिट पिशवीत ठेवण्यासाठी मदतीचा बहाणा करून भामट्यांनी रोकडसह अलंकार लांबविले. ही बाब घरी परतल्यानंतर वृध्दांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक दिपक तोंडे करीत आहेत.