इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई -विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारताने दणदणीत पराभव केला. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर २०० धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान भारताने ४ विकेट देत ४१.२ षटकात पूर्ण केले. या सामन्यात तीन खेळाडू लवकर बादल झाल्यानंतर के.एल राहुल व विराट कोहली जोडीने मोठी भागीदारी करुन डाव सावरला. या सामन्यात विराट कोहलीने ८५ धावा केल्या. या खेळीत ६ चौकार लगावले. तर के.एल.राहुल ९७ धावा करत नाबाद राहिला. विश्वचषक स्पर्धेत १९९२ नंतर ३१ वर्षात प्रथमच ऑस्ट्रेलियाची सुरुवात पराभवाने झाली. रोहित शर्मा , ईशान किशन, श्रयेस अय्यर हे तीन्ही खेळाडू आज शुन्यावर बाद झाले. हार्दिक पांड्याने नाबाद ११ धावा केल्या.
या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाने घेतला. पण, पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची भारतीय गोलंदाजासमोर चांगली दमछाक झाली. सुरुवातीपासून ऑस्ट्रेलियाचे खेळाडू चाचपडत खेळत होते. या सामन्यात भारतीय गोलंदाजाने १९९ देत ऑस्ट्रेलिया संघाला ऑलआऊट केले. सर्वच गोलंदाजींनी आज चांगली कामगिरी केली. रविंद्र जडेजा ३, जसप्रीत बुमराह व कुलदिप यादव याने प्रत्येकी २, तर मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, आर. अश्विन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
चेन्नईच्या मैदानावर ही पहिली लढत चांगली रंगली. हे दोन्ही संघ विश्वचषकाचे दावेदार असल्यामुळे या सामन्यांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भारतासाठी हा सामना खूप महत्त्वाचा होता. विश्वचषकाची सुरुवात बलाढ्य संघाबरोबर झाली. यात भारताने हा सामना जिंकला त्यामुळे संघाचा प्रचंड आत्मविश्वास वाढला. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा संघही यजमान भारताचा पराभव करत विजयाने सुरुवात करण्यासाठी जोरदार प्रयत्न असतांना त्यांना आज फलंदाजी व गोलंदाजीमध्ये प्रभाव टाकता आला नाही.
या सामन्यावर पावसाचे सावट असले तरी आज पाऊस पडला नाही. या पहिल्याच सामन्यात शुबमन गिल याला डेंग्युची लागण झाल्यामुळे भारताला थोडं टेन्शन होते. पण, भारतीय संघाने फलंदाजी व गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करुन ऑस्ट्रेलियाचा दणदणीत पराभव केला.
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रविंद्र जडेजा, आर. अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह
ऑस्ट्रेलियाचा संघ
डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव स्मिथ, मार्नस लाबुशेन, कॅमरून ग्रीन, एलेक्स कॅरी, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), जोश हेजलवूड, एडम जम्पा.