इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लखनऊः बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांचा आज वाढदिवस उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बसपाच्या कार्यालयाबाहेर मोठमोठे होर्डिंग लावण्यात आले. दरम्यान, बसप प्रमुख मायावती ‘इंडिया अलायन्स’ संदर्भात मोठी घोषणा करू शकतात अशी सर्वांना उत्सुकता होती. पण, मायवतींनी आज कोणाबरोबर युती न करण्याचे सांगत काँग्रेस, भाजप व समाजवादी पार्टीवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी दुस-या पक्षांबरोबर आघाडी केली तर आमची मते त्यांना पडतात. पण, त्यांची मते आम्हाला पडत नसल्याचे सांगत वेगवेगळ्या निवडणुकांचे दाखलेही दिले.
मायावती यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाच्या लखनऊ कार्यालयात संपन्न झाला. मायावती आज बसपच्या ब्लू बुक, ‘माय स्ट्रगल लाइफ आणि बसप आंदोलन का सफरनामा’ भाग१९ च्या हिंदी आणि इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन केले. त्यानंतर त्यांच्या पुढील वाटचालीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. पण, आज पत्रकार परिषदेत त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचे सांगत सर्वांना धक्का दिला. त्यामुळे ‘इंडिया’ आघाडीत सामील होणार असल्याच्या चर्चेला यामुळे विराम मिळाला.
आज काही काँग्रेस नेते त्यांना भेटायला जाणार होते. तर दुसरीकडे समाजवादी पक्षाची त्यांच्याबाबतची भूमिका मवाळ झाली होती. तर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. पण, मायावतींने सर्वांना धक्का देत एकला चलो रे चा नारा दिला.