इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
इंफाळः एकीकडे काँग्रेसला मोठे नेते सोडचिठ्ठी देत असतांना दुसरीकडे पक्षविरोधी कारवायांमुळे बहुजन समाज पक्षातून निलंबित करण्यात आलेले लोकसभा खासदार दानिश अली यांची काँग्रेसशी जवळीक वाढत आहे. दानिश अली काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’मध्ये सामील होण्यासाठी मणिपूरला आले.
खासदार दानिश यांनी एक्स या ‘सोशल मीडिया’ प्लॅटफॉर्मवर अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. त्याने राहुल गांधी यांच्यासोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत. भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी संसदेत त्यांच्याबद्दल असंसदीय टिप्पणी केली होती, त्यावरून राजकीय गदारोळ झाला. या घटनेनंतर राहुल गांधी यांनी दानिश अली यांची भेट घेतली होती. ‘सोशल मीडिया’ पोस्टच्या मालिकेत राहुल गांधी यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करताना दानिश अली म्हणाले, की आज मी राहुल गांधींच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. हा माझ्यासाठी खूप खास आणि महत्त्वाचा क्षण आहे. खूप आत्मपरीक्षण केल्यानंतरच मी हा निर्णय घेतला आहे आणि शेवटी या निष्कर्षावर पोहोचलो आहे.
देशात निर्माण झालेली परिस्थिती आणि वातावरण पाहता माझ्यासमोर दोन पर्याय होते. एकता आणि न्यायासाठी सर्वात मोठी मोहीम असे वर्णन करून ते म्हणाले, की राहुल यांची यात्रा म्हणजे ‘एकता आणि न्यायासाठीची सर्वात मोठी मोहीम.’ ते यात सामील झाले नाहीत तर ते राजकारणी म्हणून आपले कर्तव्य योग्यरित्या पार पाडू शकणार नाहीत, असे ते म्हणाले. माझ्याकडे दोन पर्याय होते, एक म्हणजे यथास्थिती स्वीकारणे आणि दुसरा म्हणजे दलित, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक आणि गरीब घटकांच्या शोषणाविरोधात मोहीम उघडणे. देश विभाजनासाठी निर्माण केलेल्या वातावरणाविरुद्ध सर्वांगीण मोहीम सुरू करणे. माझ्या सद्सद्विवेकबुद्धीने मला दुसरा पर्याय स्वीकारण्यास प्रवृत्त केले आणि मी राहुल गांधींच्या या मोहिमेत सहभागी झालो. ते म्हणाले, की दुसऱ्या पर्यायाची निवड करणे साहजिक आहे. कारण देशात संसदेच्या आत अशा हल्ल्याचे ते बळी ठरले होते. सत्ताधारी पक्षाच्या एका सदस्याने माझ्या आणि माझ्या धर्माबद्दल अपशब्द वापरले.