इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे साहिल पारख, रोहन शेडगे व प्रतीक तिवारी यांची १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघात, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय – २०२३ -२४ च्या विनू मंकड करंडक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. साहिल पारख डावखुरा सलामीवीर असून त्याची याआधी १६ वर्षांखालील वयोगटात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय तर्फे आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमी – एन सी ए – च्या राष्ट्रीय पातळीवरील शिबिरासाठी निवड झाली होती.
१७ एप्रिल ते ११ मे दरम्यान माजी कसोटीपटू व्हि व्हि एस लक्ष्मण प्रमुख असलेल्या एन सी ए, बेंगळुरू तर्फे भारतभरातील उदयोन्मुख , कुमार खेळाडूंसाठी हे शिबीर झाले होते. साहिलची १६ वर्षांखालील महाराष्ट्र संघातही निवड झाली होती. सुरत येथे खेळल्या गेलेल्या बी सी सी आय विजय मर्चंट ट्रॉफीत महाराष्ट्र संघाच्या सिक्कीम संघावरील विजयात साहिलने केवळ १४९ चेंडूत ३५ चौकार व ४ षटकारांसह तूफान फटकेबाजी करत धमाकेदार नाबाद २२४ धावा केल्या व नंतर आसाम विरुद्ध हि अर्धशतक केले होते.
नाशिकच्या डावखुरा फिरकीपटू गोलंदाज प्रतीक तिवारी याने २०२२-२३ च्या हंगामात ,१९ वर्षांखालील महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना विनू मंकड करंडक स्पर्धेतील सामन्यांत जोरदार कामगिरी करून उपांत्य फेरीपर्यंत स्पर्धेत सर्वाधिक बळी घेत , राष्ट्रीय पातळीवर गोलंदाजीत प्रथम स्थान मिळवले. प्रतीकने आठ सामन्यात एकूण १६ बळी अशी अतिशय प्रभावी कामगिरी केली. सात डावात ६२ षटके , २४४ धावा, षटकामागे ३.९३ धावा देत १६ बळी हि त्याची एकंदर कामगिरी झाली. प्रतीकची देखील १९ वर्षांखालील वयोगटात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय तर्फे आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमी – एन सी ए – च्या राष्ट्रीय पातळीवरील शिबिरासाठी निवड झाली होती . २४ एप्रिल ते १८ मे दरम्यान माजी कसोटीपटू व्हि व्हि एस लक्ष्मण प्रमुख असलेल्या एन सी ए, बेंगळुरू तर्फे भारतभरातील उदयोन्मुख , होतकरू खेळाडूंसाठी हे शिबीर आले होते.
नाशिकच्या डावखुरा जलदगती गोलंदाज रोहन शेडगेची यंदा २०२३ -२४ च्या विनू मंकड करंडक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत ( एम सी ए इन्विटेशन लीग ) त्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. वेळोवेळी झालेल्या अशा राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धेत केलेल्या लक्षणीय कामगिरीच्या जोरावरच साहिल पारख, रोहन शेडगे व प्रतीक तिवारी यांची राष्ट्रीय पातळीवरील भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय – २०२३ -२४ च्या विनू मंकड करंडक स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
२०२३ – २४ च्या विनू मंकड करंडक स्पर्धा १२ ते ३० ऑक्टोबर दरम्यान विजयवाडा येथे होत आहे. महाराष्ट्र संघाचा पहिला सामना १२ ऑक्टोबर रोजी दिल्ली संघाबरोबर होणार आहे. महाराष्ट्राचे बाकी सामने पुढीलप्रमाणे होणार आहेत : १४ ऑक्टोबर – हैद्राबाद , १६ ऑक्टोबर – बंगाल , १८ ऑक्टोबर – उत्तराखंड व २० ऑक्टोबर – मेघालय .
साहिल पारख, रोहन शेडगे व प्रतीक तिवारी या तीन नवयुवकांच्या या महत्वपूर्ण निवडीबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतीकचे अभिनंदन करून यापुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.