नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– ‘ज्ञानोबा माऊली’चा जयघोष करीत निघालेल्या पंढरीच्या वारीला महाकवी कालिदास कलामंदिरात महाराष्ट्रासह उपस्थित विविध राज्यातील युवकांनी भरभरून उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. पंढरीच्या वारीबरोबरच पंजाबच्या युवकांनी सादर केलेल्या भांगडा नृत्यालाही उपस्थितांनी दाद दिली. याशिवाय विविध राज्यातील युवकांनी आपापल्या राज्यातील लोकसंस्कृतीचे नृत्यातून दर्शन घडवित उपस्थितांची मने जिंकली. दरम्यान, या महोत्सवास नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे उपस्थित होते. त्यांनी युवकांशी संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्या.
नाशिक येथे १२ जानेवारीपासून २७ वा राष्ट्रीय युवा महोत्सव सुरू आहे. या महोत्सवात आज सकाळी महाकवी कालिदास कलामंदिरात देशभरातून आलेल्या विविध राज्यातील पथकांनी आपापल्या राज्यातील पारंपरिक नृत्य सादरीकरणाचा कार्यक्रम झाला. यावेळी क्रीडा उपसंचालक शेखर पाटील (नागपूर), युवराज नायक, नवनाथ फडतरे (पुणे), सहाय्यक संचालक क्रीडा मिलिंद दीक्षित (पुणे), जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील (नाशिक), गणेश जाधव (अमरावती) आदिसह मान्यवर उपस्थित होते.
सकाळच्या पहिल्या सत्रात तमिळनाडूच्या युवकांनी ‘कारगम’ नृत्य सादर केले. हे नृत्य पावसाच्या आराधनेसाठी केले जाते. त्यानंतर अरुणाचल प्रदेशाच्या युवकांनी बुईया, तर गोव्याच्या युवकांनी पारंपरिक वीरभद्र लोकनृत्य सादर केले. आंध्र प्रदेश, तेलंगणा, पंजाबच्या युवकांनी लोकनृत्य सादर केली.
या महोत्सवात महाराष्ट्राच्या पथकाने सकाळच्या सत्रात ‘सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान’ याविषयावर पथनाट्य सादर केले. दुसऱ्या सत्रात महाराष्ट्राच्या युवकांनी पंढरीची वारी या विषयावर टाळ मृदुंगाच्या गजरात हातात भगवे झेंडे, डोक्यावर तुळशी वृंदावन तर खांद्यावर पालखी घेऊन नृत्य सादर केले. यावेळी त्यांनी विविध संताचे अभंग सादर करीत विविध राज्यातील उपस्थित युवकांना महाराष्ट्राच्या आगळ्या- वेगळ्या धार्मिक उत्सवाचे दर्शन घडविले. पुंडलिक वरदा, ज्ञानोबा माऊली, संत तुकाराम, विठोबा- रखुमाईच्या गजराने कालिदास कलामंदिर दुमदुमले होते. तसेच यानंतर झालेल्या बैठकीची लावणीलाही उपस्थितांनी दाद दिली.
युवा महोत्सवाचे आयोजन गौरवाची बाब : पालकमंत्री दादाजी भुसे
पालकमंत्री भुसे म्हणाले की, नाशिक शहरात प्रथमच राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ही नाशिककरांसाठी गौरवाची बाब आहे. या महोत्सवात देशाच्या विविध राज्यातील साडेसात हजारांवर युवक-युवती सहभागी झाले आहेत. त्यांच्यासाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या महोत्सवात विविध राज्यातून आलेल्या तरुणांमुळे भारतीय संस्कृतीची एकमेकांना ओळख होण्यास मदत होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. भोपाळ येथील हास्य कलाकार मयंक झा, मॉडेल सलोनी कर्ण यांनी सूत्रसंचालन केले.