इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राजस्तानमध्ये ट्रँक्टरखाली चिरडून हत्या केल्याच्या घटनेला काही महिने उलटत नाही तोच उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील एका गावात ट्रॅक्टरखाली चिरडून एका तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. गावातील गुंडांनी आधी तरुणाला आपल्याकडे बोलावले आणि नंतर त्याला दारू पाजली. त्याला दारू पाजल्यानंतर काही वादातून गुंडांनी त्याला ट्रॅक्टरने चिरडून ठार केले. त्यानंतर हे आरोपी फरार झाले आहे.
बडा येथील जमुना प्रसाद याला शनिवारी गावातील काही गुंडांनी पळवून नेले. जमुना त्यांच्यासोबत गेले आणि बराच वेळ घरी परतले नाही. कुटुंबीयांनी नंतर त्यांचा शोध घेतला. गावातच एका निर्जन ठिकाणी त्यांना जमुना प्रसादचा मृतदेह सापडला. जमुना याला ट्रॅक्टरखाली अनेकवेळा चिरडून ठार केले आहे.
पोलिस अधीक्षक मुकेश चंद्र यांनी सांगितले, की जमुनाच्या कुटुंबीयांनी गावात राहणाऱ्या शक्तिशाली कुटुंबावर हत्येचा आरोप केला आहे. जमुना यांचे नातेवाईक नेपाल सिंह यांनी फोनवरून पोलिसांना माहिती दिली. जमुना हिला त्याच गावातील ईश्वरी प्रसाद, परमेश्वरी, कुंवर पाल यांनी ट्रॅक्टरखाली चिरडून ठार केले. माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून तपास केला. पोलिसांनी जमुनाचा मृतदेह ताब्यात घेतला असून, पंचनामा तयार करून तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.