इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयात समावेश असलेल्या आणि ज्यांच्यावर नुकतीच मोठी जबाबदारी सोपवलेल्या माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी अखेर दहा माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश घेतला. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी हा प्रवेश घेतला. उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज होऊन त्यांनी काँग्रेस सोडली आहे. दक्षिण मुंबईतील कुलाबा लोकसभा मतदारसंघातून ते महायुतीचे उमेदवार असतील किंवा त्यांची राज्यसभेवर वर्णी लागेल असे बोलले जात आहे.
युवा ब्रिगेडच्या ज्योतिरादित्य शिंदे यांच्यानंतर मिलिंद देवरा यांनी आज काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. देवरा हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाले. आज त्यांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर वर्षां बंगल्यावर त्यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश केला.
दोनदा खासदार व नंतर दक्षिण मुंबईतून दोनदा पराभूत झालेले देवरा त्याच जागेसाठी आग्रही होते; परंतु गेल्या दहा वर्षांपासूनचे खासदार अरविंद सावंत ही जागा सोडायला तयार नाहीत. ठाकरे गटाने ही जागा लढवण्यावर ठाम राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे देवरा यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. देवरा यांना भाजपत जायचे होते; पण महायुतीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने भाजपच्या सल्ल्यानुसारच देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचे सांगितले जाते.