इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या वतीने आज विस्तार अधिकारी (सांख्यिकी) या पदासाठीची परीक्षा ही ७ परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीत पार पडली. विस्तार अधिकारी (सांख्यिकी) या पदासाठी १२८१ परीक्षार्थी पैकी १०१३ परीक्षार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते तर २६८ गैरहजर होते. कालही वरिष्ठ सहायक पदाच्या परिक्षेसाठी ३१३ परिक्षार्थींनी दांडी मारली होती. आजही ती कायम आहे.
ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद पदभरतीतील ८ पदांसाठी नियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा ही घेण्यात येत आहे. त्यानुषंगाने आज विस्तार अधिकारी सांख्यिकी या पदासाठी परीक्षा ही पार पडली. नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सर्व परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी करून उपस्थित अधिकारी यांच्याकडून परीक्षा सुरळीत सुरू असल्याबाबतची माहिती घेतली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी देखील सर्व परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या.
सर्व परीक्षा केंद्रांवर मोबाईल जॅमर यंत्रणा कार्यान्वित असल्याबाबतची खात्री ही जिल्हा परिषद प्रशासनामार्फत करण्यात येत होती, त्याचबरोबर काही परीक्षा केंद्रांवर काल झालेल्या परीक्षा केंद्रांवर अस्वच्छता असल्याबाबतच्या तक्रारी या जिल्हा परिषद प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या त्यानुषंगाने सर्व परीक्षा केंद्रांवर स्वच्छता करण्याबाबतच्या सूचना या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिल्या होत्या.
पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार शहरी भागातील परीक्षा केंद्रांवर व ग्रामीण भागात पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या माध्यमातून सर्व परीक्षा केंद्रांवर रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली होती. अंजनेरी येथील परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू असताना विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर अधीक्षक अभियंता विद्युत यांनी तातडीने विद्युत पुरवठा सुरळीत केला, सदर विद्युत पुरवठा खंडित कालावधीत परीक्षा केंद्रावरील राखीव विद्युत उपकरणातुन विद्युत पुरवठा सुरळीत केला गेला. जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली आता १० व ११ ऑक्टोबर रोजी विस्तार अधिकारी (कृषी), आरोग्य पर्यवेक्षक, लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुलेखक (उच्च श्रेणी), कनिष्ठ सहायक (लेखा) या ५ पदांसाठी परीक्षा होणार आहे अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.