इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लखनऊः उत्तर प्रदेशातील कैसरगंज मतदारसंघातील भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह आणि भारतीय कुस्ती संघटनेचे निलंबित अध्यक्ष संजय सिंह यांना फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या. संजय सिंह यांच्या फिर्यादीनुसार, भेलुपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शुक्रवारी रात्री दोनदा आणि त्यानंतर शनिवारी दुपारीही फोन करून धमकी दिली आहे. संजय सिंह यांनी सांगितले, की शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास एका अनोळखी नंबरवरून फोन आला. सुमारे दीड तासानंतर पुन्हा त्याच नंबरवरून कॉल आला. त्याने धमकी दिली. कुणीतरी खोडसाळ केल्यासारखे वाटत होते; त्यानंतर शनिवारी दुपारी त्याच नंबरवरून फोन आला. कॉलरने त्याला आणि ब्रिजभूषण शरण सिंह याला गोळ्या घालून बॉम्बने उडवण्याची धमकी आली. संजय सिंह यांना शिवीगाळ करून फोन कट केला. त्यानंतर फोन करून धमक्या देण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांनी सहा वेळा फोन केला; मात्र संजय सिंह यांनी ते रिसिव्ह केले नाही.
भेलुपूरचे निरीक्षक विजय कुमार शुक्ला यांनी सांगितले, की मोबाईल क्रमांकाच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या नंबर बंद आहे. आरोपींची ओळख पटवून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल. पोलिस तपासात मोबाईल क्रमांक लखनऊच्या करण राजपूतच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले. संभाषणातील आवाज वाराणसी किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यातील असल्याचे दिसते.