इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी शेकोटी पेटवणे सामान्य आहे; पण हीच शेकोटी आता लोकांच्या मृत्यूचे कारण बनत आहे.
अलीपूरमध्ये शेकोटीमुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पती, पत्नी आणि दोन मुलांचाही समावेश आहे. रात्री शेकोटी पेटवून ते झोपले त्यानतंर घरात झालेल्या धुरामुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळी शेजाऱ्यांनी त्यांचा मृतदेह पाहिल्यानंतर घबराट पसरली.
या घटनेची माहिती शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून घराची खिडकी तोडून आत प्रवेश केला असता चौघेही मृतावस्थेत होते. गुदमरल्याने मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे; मात्र या प्रकरणाची प्रत्येक बाजूने चौकशी करण्यात येत आहे. यापूर्वीही अशी प्रकरणे समोर आली आहेत.
यामुळे होतो मृत्यू
यापूर्वी दिल्लीतील द्वारका येथेही असेच एक प्रकरण समोर आले होते, ज्यात एका जोडप्याचा मृत्यू झाला होता; मात्र त्यांचा दोन महिन्यांचा मुलगा थोडक्यात बचावला. फायरप्लेसमध्ये वापरण्यात येणारा कोळसा आणि लाकूड जाळल्याने कार्बन मोनोऑक्साइड तयार होतो. बंद खोलीत शेकोटी पेटवली तर कार्बन मोनॉक्साईड वाढते आणि ऑक्सिजन कमी होतो. त्यामुळे मेंदूवर परिणाम होतो आणि श्वासाद्वारे कार्बन शरीरात पसरतो. अशा परिस्थितीत शेकोटी पेटवताना घराची कोणतीही खिडकी किंवा दरवाजा उघडा असणे आवश्यक आहे.