मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयात समावेश असलेल्या आणि ज्यांच्यावर नुकतीच मोठी जबाबदारी सोपवलेल्या माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी अखेर काँग्रेस सोडली आहे. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज होऊन त्यांनी काँग्रेस सोडली आहे. दक्षिण मुंबईतील कुलाबा लोकसभा मतदारसंघातून ते महायुतीचे उमेदवार असतील.
काँग्रेसने देवरा कुटुंबाला भरपूर दिले. सोनिया आणि राहुल यांच्यांशी त्यांचे चांगले संबंध होते, तरीही ते ‘जी २३’ गटात सामील झाले होते. युवा ब्रिगेडच्या ज्योतिरादित्य शिंदे यांच्यानंतर मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. देवरा हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाले सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर वर्षां बंगल्यावर त्यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश झाला. मुंबईच्या काही नगरसेवकांनी ही प्रवेश केला.
दोनदा खासदार व नंतर दक्षिण मुंबईतून दोनदा पराभूत झालेले देवरा त्याच जागेसाठी होते; परंतु गेल्या दहा वर्षांपासूनचे खासदार अरविंद सावंत ही जागा सोडायला तयार नाहीत. ठाकरे गटाने ही जागा लढवण्यावर ठाम राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे देवरा यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. देवरा यांना भाजपत जायचे होते; पण महायुतीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने भाजपच्या सल्ल्यानुसारच देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचे सांगितले जाते.
देवरा यांनी ट्वीटमध्ये म्हटले, की आज माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाचा अध्याय संपला आहे. मी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. माझ्या कुटुंबाचे पक्षाशी असलेले ५५ वर्षांचे नाते संपवत आहे. गरवारे क्लब आणि मुंबई काँग्रेस कार्यालयातील काँग्रेस पदाधिकार्यांच्या बैठकीकडे देवरा यांनी पाठ फिरवली होती. बैठकीला उपस्थित राहण्याबाबत अनेक नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता; मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. देवरा यांनी सीमोल्लंघन करावे, यासाठी एका वजनदार उद्यागपतीने त्यांची मनधरणी केली. शिंदे गटातील प्रवेशाने देवरा यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.