इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूर – खेळाडूंनी क्रीडा साहित्यासाठी, दिव्यांगांनी कृत्रिम अवयवांसाठी, निराधारांनी आधारासाठी आणि तरुणांनी नाविन्यपूर्ण प्रयोगांना पाठबळ मिळावे म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमात रविवारी गर्दी केली.
गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमाची सर्वसामान्य नागरिक आतुरतेने वाट बघत असतात. विविध समस्या, मागण्या आणि नाविन्यपूर्ण प्रयोग घेऊन लोक मंत्री महोदयांना भेटत असतात. त्यानुसार रविवार, ८ आक्टोबरला देखील सकाळपासून नागरिकांनी केली होती. काही संस्थांनी आपल्याकडे मैदान उपलब्ध आहे, संस्थाही आहे, पण क्रीडा साहित्याची उणीव आहे, असे सांगितले. त्यांना आवश्यक क्रीडा साहित्य पुरविण्याच्या संदर्भात मंत्री महोदयांनी सूचना दिल्या. याशिवाय दिव्यांग बांधवांनी कृत्रिम अवयवांसाठी निवेदने दिली.
कुणाला पायाची तर कुणाला हाताची आवश्यकता आहे. त्यांना आवश्यक मदत करण्याच्यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना ना. श्री. गडकरी यांनी दिल्या. नागपूर रेल्वे स्थानकावरील कुलींच्या संघटनेने देखील मंत्री महोदयांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. नागपुरातील विविध संस्थांच्या महिलांनी गडकरी यांना नवरात्रातील उपक्रमांचे निमंत्रण दिले. स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मोहिमेंतर्गत ना. श्री. गडकरी यांच्या हस्ते गरजूंना श्रवणयंत्र प्रदान करण्यात आले.
‘मुलगा लांब गेला साहेब’
आमच्या मुलाला घरापासून लांब नोकरी आहे. आम्ही दोघेही वृद्ध असून घरी एकटेच असतो. विविध आजारांनी आम्हाला ग्रासले आहे. आपण पुढाकार घेऊन मुलाच्या नागपुरातील बदलीसाठी प्रयत्न करावे, अशी विनंती करणारा अर्ज वृद्ध आई-वडिलांनी ना. श्री. गडकरी यांना दिला. शक्यता तपासून सहकार्य करण्याच्या सूचना ना. श्री. गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
मायलेज वाढविणारा प्रयोग
पेट्रोल-डिझेलमध्ये एक विशिष्ट्य वनस्पती तेल ठराविक प्रमाणात टाकले तर मायलेज वाढविण्यास मदत होऊ शकते, असा प्रयोग नाशिकच्या श्रीनिवास इनोव्हेशन्स या कंपनीने ना. श्री. गडकरी यांच्यापुढे सादर केला. १ लिटर पेट्रोलमागे या कंपनीने तयार केलेले वनस्पती तेल २ मिली एवढ्या प्रमाणात टाकले तर पेट्रोलची ज्वलनक्षमता १२ टक्क्यांनी वाढू शकते आणि शिवाय इंधनामुळे होणारे प्रदूषणही ८० टक्क्यांहून अधिक प्रमाणात कमी करता येऊ शकते, असे या कंपनीचे म्हणणे आहे. ना. श्री. गडकरी यांनी हा नाविन्यपूर्ण प्रयोग समजून घेतला.