सातपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सातपूर औद्योगिक वसाहतीत अपघात सत्र सुरूच असून शनिवारी (दि.१३) मनपाच्या सिटी लिंक बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार कामगार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. सीएट कंपनी समोर हा अपघात झाला असून यापूर्वीही कार्बन नका ते ज्योती स्ट्रक्चर कंपनी दरम्यानच्या रस्त्यात अनेक अपघात झाले आहे.
शिवाजी विश्वनाथ झोटे (वय, ५३ रा. शिवाजी नगर) असे अपघातात मयत झालेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिवाजी झोटे हे आपली दुचाकीवरून (क्र.एमएच १५ एए ८९७०) शनिवारी (दि.१३) सकाळी ८ वाजेच्या सुमारास कामावर जात होते. सीएट कंपनी जवळ आले असता मागून भरधाव वेगाने येणाऱ्या नाशिक मनपाच्या सिटीलिंक बसने (क्र. एमएच १५ जीएन ७६९८ ) शिवाजी यांच्या दुचाकीला कट मारला. यात शिवाजी खाली कोसळले. त्यांच्या डोक्याला जबरी मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
शिवाजी झोटे हे सातपूर मधील लिज्जत पापड कंपनी मध्ये कामास होते. त्याच्या पश्चात दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे.दरम्यान, सिटी लिंक बसच्या वाहनचालकावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी यासाठी सातपूर पोलीस स्टेशन ठाण्यात शिवाजी यांच्या नातेवाईक व कंपनी कामगारांनी गर्दी केली होती. सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी नातेवाईक व कामगारांची समजूत काढत कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईक माघारी फिरले.
आता थेट आंदोलन
कार्बन नाका ते ज्योती स्टक्चर कंपनी पर्यंतचा मुख्य रस्ता अरुंद असून पावसाळी नाल्यावर अरुंद पूल आहेत. या रस्तावर मोठ्या प्रमाणात नेहमी अपघात होत असतात. याबाबत वंचित बहुजन आघाडी नाशिक शहर सचिव बजरंग शिंदे यांनी वेळोवेळी मनपा व पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधत, रस्ता रुंदीकरण व रस्त्यावर बेकायदेशीरपणे वाहने पार्किंग करणाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे. मात्र ढीम्म प्रशासन याकडे लक्ष देत नसून आणखी किती जीव घेणार असा सवाल उपस्थित करत बजरंग शिंदे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.