जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्ह्यात वाळूमाफियांची मुजोरी वाढली असून, आता शासकीय अधिकार्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली. एरंडोल तालुक्यातील उत्राण येथे गिरणा नदीपात्रात कारवाईसाठी गेलेले उपविभागीय अधिकार्यांना जमिनीवर पाडून गळा दाबत जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. वाळूमाफियांनी पथकावर दगडफेकही केली. याप्रकरणी कासोदा येथील पोलीस ठाण्यात मुख्य संशयितासह १०-१२ अज्ञात मारेकर्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील कासोदा पोलीस ठाणपासून अवघ्या १७ किलोमीटरवरील उत्राण येथील गिरणा नदीपात्रात मध्यरात्रीनंतर साडेबाराच्या सुमारास एरंडोल येथील उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वात उत्राणचे मंडळ अधिकारी प्रमोद मेघश्याम गायधनी, भालगावचे मंडळ अधिकारी दीपक ठोंबरे, तलाठी शेख शकील, निपाणीचे तलाठी विश्वंभर शिरसाठ, पोलीसपाटील प्रदीप तिवारी, महाजन आदींचे पथक उतरले. तेथे ८ ते १० ट्रॅक्टर वाळू भरत असल्याचे दिसून आले. पथकाला पाहताच चालकांनी ट्रॅक्टर भरधाव घेत पलायन केले. मात्र, तेथो दोन ट्रॅक्टर थांबले होते. पथकाने मुसक्या आवळताच आणखी चार-पाच जण आले. त्यांना उपविभागीय अधिकारी गायकवाड, मंडळ अधिकारी गायधनी यांनी सरकारी कामात अडथळा आणू नका, असे बजावत आमचे काम करू द्या, असे सांगताच ट्रॅक्टरचालक आकाश राजेंद्र पाटील, अमोल, राहुल, दादाभाऊ, सागर (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) यांच्यासह १०-१२ अज्ञात मारेकर्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पथकातील अधिकार्यांना पकडत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. उपविभागीय अधिकारी गायकवाड यांना जमिनीवर पाडून त्यांचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
श्री.गायकवाड यांची प्रमोद गायधनी, दीपक ठोंबरे यांच्यासह कर्मचार्यांनी कसेबसे वाळूमाफियांच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर संशयितांनी दगडफेक केल्याने गायकवाड, गायधनी, ठोंबरे यांच्यासह कर्मचारी जखमी झाले. दगडफेकीत गायकवाड यांचा डोळा थोडक्यात बचावला. गायधनी यांच्या हाताला, कंबरेवर मुका मार लागला आहे. त्यांच्यावर एरंडोल येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. उत्राणचे मंडळ अधिकारी गायधनी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कासोदा येथील पोलीस ठाण्यात मुख्य संशयित आकाश पाटील याच्यासह १०-१२ अज्ञात मारेकर्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच चाळीसगावचे सहायक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख, भडगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक तथा कासोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजेंद्र पाटील, उपनिरीक्षक अमोल गुंजाळ यांनी भेट देत जखमी अधिकार्यांची विचारपूस केली.
लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
आमच्या अंगावर बसून मारेकर्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आम्हीही प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मारेकर्यांचे संख्याबळ अधिक असल्यामुळे आम्ही तेथून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी केलेल्या दगडफेकीत आम्ही सर्व जखमी झालो. एरंडोल येथील शासकीय रुग्णालयात उपचार केले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना घटनेची माहिती देत, पथकांना हत्यारे देण्याची मागणी केली आहे.”
प्रमोद गायधनी (जखमी मंडळ अधिकारी, उत्राण, ता. एरंडोल)