मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महायुती सरकारचा आठ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा उघडकीस आला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. केवळ सात दिवसांच्या शॉर्ट नोटीसवर रुग्णवाहिका खरेदीचा निर्णय महायुती सरकारने घेतला. चार हजार कोटींच्या रुग्णवाहिका खरेदीसाठी आठ हजार कोटींचा खर्च कशासाठी, असा प्रश्न त्यांनी केला.
दोन जुलैच्या मंत्रिमंडळ बैठकीत निविदा काढण्याचा निर्णय झाला. चार ऑगस्ट रोजी अध्यादेश निघाला. पहिल्या निविदेची मुदत दिवस होती. पुढे ही निविदा रद्द करण्यात आली. हिल्याच निविदेवर दुसरी निविदा निघाली,तिची मुदत सात दिवस होती. याबाबत प्री-बिड मीटिंग घेतली नाही, असा तपशील वडेट्टीवार यांनी दिला. मर्जीतील माणसांना कोट्यावधीची काम देण्यासाठी, अशी शक्कल लढवली जते. केवळ सात दिवसाच्या शॉर्ट नोटीसवर १०८ रुग्णवाहिकांसाठी निविदा आठ हजार कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली. रुग्णवाहिकांसाठी कोणतीगी निविदा तीन वर्षांपेक्षा जास्त नसते; मात्र ही निविदा दहा वर्षांसाठी आहे, असा आरोप करून १०८ रुग्णवाहिकांची किंमत चार हजार कोटी रुपये होते; मात्र सरकारने त्यावर आठ हजार कोटी रुपये दाखवले आहेत, असे वडेट्टीवार यांनी निदर्शनास आणले.
आरोग्य विभागाच्या मंत्र्यासह आयएएस अधिकाऱ्याला बदलीचा धाक दाखवून मर्जीतील माणसासाठी ही निविदा काढण्यात आली. त्यातून यातून चार हजार कोटींची कमाई होणार असून ही जनतेच्या पैशांची लूट असल्याचा आरोप त्यांनी केला. आरोग्य खाते भ्रष्टाचारामध्ये बुडाले आहे. मंत्र्याच्या जवळच्या नातेवाइकाला हे काम मिळवून द्यायचे आहे. त्यात मंत्र्याची भागीदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मी ही निविदा थांबवण्यासाठी विनंती करणार आहे; मात्र सगळेच चोरचोर मावस भाऊ असल्याने ते ही निविदा रद्द करणार नाही. एका विशिष्ट कंपनीला निविदा देण्यासाठी हे सगळे प्रयत्न आहेत, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.