नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मैत्रीचा बहाणा करून एकाने अल्पवयीन मुलीवर चार वर्ष वेळोवेळी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. संशयिताचा अतिरेक वाढल्याने हा प्रकार पोलिसात गेला असून याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात बलात्कारासह बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गंजमाळ भागात राहणा-या १७ वर्षीय पीडितेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पीडिता व संशयित एकाच भागात वास्तव्यास असून त्यांच्यात मैत्री होती. या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्याने संशयिताने मुलीस लग्नाचे आमिष दाखविले होते.
गेली चार वर्ष दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू असतांना संशयिताने मुलीस नाशिक,त्र्यंबकेश्वर आणि राजस्थान येथील अजमेर येथे देवदर्शनासाठी घेवून जात लॉजिंगमध्ये तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. शिवीगाळ व दमदाटी करीत संशयिताकडून मागणी वाढल्याने युवतीने पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शिवाजी अहिरे करीत आहेत.