इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित, एनडीसीए प्रोफेशनल लीग २०२३ -२४ चा थरार ७ ते २६ ऑक्टोबर दरम्यान रंगणार आहे. नाशिकमधील ६ संघांत, एनडीसीएच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब येथे सदर स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेत सहा संघ सहभागी होणार असून ते ग्रिफिन लायन्स, ए बी ११, प्रो जंबो, नित्यम केटरीओ, पंचवटी वॉरीअर्स, मराठा वॉरीअर्स हे आहेत.
शुक्रवार ७ ऑक्टोबर रोजी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांचे शुभहस्ते हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लबवर मराठा वॉरीअर्स विरुद्ध ग्रिफिन लायन्स या सामन्याच्या नाणेफेकीने शुभारंभ झाला. या प्रसंगी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे, तसेच चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे खजिनदार हेमंत देशपांडे, कार्यकारीणी सदस्य अनिरुद्ध भांडारकर,शिवाजी उगले आदि पदाधिकारी उपस्थित होते .
नाशिक मधील डॉक्टर्स,आर्किटेक्टस, सीए, वकील, बिल्डर्स,इंजिनिअर्स,उद्योजक, व्यावसायिक असे विविध प्रोफेशन मध्ये काम करणारे खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत आहेत. सर्व संघ राऊंड रॉबिन पद्धतीने इतर पाच संघांशी साखळी सामने खेळणार आहेत .सर्व क्रिकेट प्रेमींसाठी खुशखबर म्हणजे या स्पर्धेचे थेट – live – प्रक्षेपण स्पोर्टवोट, मुंबई तर्फे करण्यात येत आहे. स्पोर्टवोट हे अँप डाउनलोड करून हजारो क्रीडाप्रेमींनी या सामन्यांचा थेट आनंद घेता येईल . मागील हंगामात स्पोर्टवोटच्या थेट प्रक्षेपणाने सुवर्ण महोत्सवी वर्षात , एन डी सी ए चा ऐतिहासिक डिजिटल अध्याय सुरु झाला व हजारो क्रीडाप्रेमींनी या सामन्यांचा थेट आनंद घेतला. तसाच या एन डी सी ए प्रोफेशनल लीग स्पर्धेचाही सर्वांनी आनंद घ्यावा असे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटने तर्फे आवाहन करण्यात येत आहे.
दोन सामन्यात हे संघ झाले विजयी
पहिल्या सामन्यात ग्रिफिन लायन्सने मराठा वॉरीअर्सचा ४६ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत ग्रिफिन लायन्सने २० षटकांत १५८ धावा केल्या , मंगेश निरभवणेने सर्वाधिक ४४ धावा केल्या. ग्रिफिन लायन्सने नंतर मराठा वॉरीअर्सला १७.२ षटकांत ११२ धावांत सर्वबाद करून सामना जिंकला . मराठा वॉरीअर्सच्या दिपक कुमारने ४३ धावा केल्या.
तर दुसऱ्या सामन्यात चुरशीच्या लढतीत ए बी ११ ने पंचवटी वॉरीअर्सचा ६ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत ए बी ११ ने २० षटकांत १६५ धावा केल्या नितीन धात्रकने नाबाद ९७ धावा फटकावल्या . ए बी ११ ने नंतर पंचवटी वॉरीअर्सला २० षटकांत ९ बाद १५९ धावांत रोखत सामना जिंकला.