इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नालासोपाऱ्यात एका तरुणाचे अपहरण करून, त्याची धारदार हत्याराने वार करून हत्या केल्याच्या घटना घडली आहे. या हत्येनंतर या टोळक्याने त्याचा मृतदेह रस्त्यावर फेकून देण्यात आले. या हत्येत दहा जणांचे टोळके असल्याचे समोर आले आहे. या खळबळजनक घटनेने वसई हादरून गेली आहे. या हत्येमागे नेमके कारण काय याचा मात्र अद्याप उलगडा झालेला नाही.
सुधीर सिंह (वय २७) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. कांदिवलीतील हा तरुण पाच वर्षांपूर्वी नालासोपाऱ्यात राहत होता. सुधीर हा त्याचा मित्र वैभव मिश्रा याच्यासोबत नालासोपारा पूर्व वालईपाडा उपाध्याय नगर चाळीत रूम बघण्यासाठी आला होता. त्या वेळी नऊ-दहा जणांचे टोळके दोन रिक्षातून आले. या टोळक्याने लाकडी दांडे, धारदार हत्यारांनी सुधीरवर प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर जखमी अवस्थेत त्याला रिक्षात घालून गावराईपाडा नाक्यावर नेऊन फेकून दिले आणि ते फरार झाले. मित्राने पेल्हार पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी गेले. तेथे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तरुणाचा मृतदेह आढळून आला.
या प्रकरणी पेल्हार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपींची ओळख पटली असून इतर आरोपींचा पोलिस शोध घेत आहे.