इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पणजीः गोव्याचे महसूल मंत्री आणि भाजप नेते बाबूश यांनी त्यांच्याच पक्षाचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पर्रीकर यांच्या २५ वर्षांच्या कार्यावर आणि वारशावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत बाबूश म्हणाले, की पर्रीकर यांनी त्यांच्या २५ वर्षांच्या राजकारणात पणजी शहर उद्ध्वस्त केले. पर्रीकर यांनी २५ वर्षे काय केले ते सांगा असा सवाल करून ते म्हणाले, की पर्रीकर यांनी पणजीतील जनतेसाठी केलेला प्रकल्प मला दाखवावा. बाबूश यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे.
पर्रीकर यांनी सल्लागार म्हणून नेमलेल्यांनी कोटयवधी रुपयांचा गंडा घातला आणि त्यांच्या गैरकृत्यांचे परिणाम आता आपण भोगत आहोत, असा आरोप बाबूश यांनी केला. बाबूश यांनी एकापाठोपाठ एक भडक कमेंट्स केल्या. बाबूश म्हणाले, की स्मार्ट सिटीची सर्व कामे त्यांचे मित्र, सल्लागार, कंत्राटदार यांना देण्यात आली. ते स्वतःला पक्षापेक्षा मोठे समजत होते. ३५ वर्षांचा अनुभव असलेल्या अभियंत्यांना बाजूला करून पर्रीकर यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करणाऱ्या सल्लागारांना सामावून घेण्याचा निर्णय घेतला, असा आरोप भाजप नेत्याने केला.
ते म्हणाले, की पणजीत भाजप पहिल्यांदाच जिंकला आहे. कारण आधी पर्रीकर पणजी जिंकल्याचे म्हणायचे. पर्रीकर स्वतःला पक्षापेक्षा मोठे समजत होते. बाबूश उत्पल पर्रीकर यांच्या टीकेवर प्रतिक्रिया देत होते. ज्यात उत्पल यांनी बाबूश यांचे वर्णन भ्रष्ट, अक्षम आणि लोकांच्या समस्यांबाबत उदासीन असे केले होते. बाबूश यांच्या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते संतप्त झाले आहेत. पर्रीकर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे गोवा भाजपचे नेतृत्व नाराज असल्याचे समजते. भाजपचे प्रदेश प्रवक्ते गिरिराज पै वेर्णेकर यांनी बाबूश यांच्यावर जोरदार प्रहार करताना पर्रीकर यांचे गोवा आणि भारतासाठी मोठे योगदान असल्याचे म्हटले. वेर्णेकर म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आधुनिक गोव्याचे शिल्पकार म्हटले होते आणि आमच्यासाठी अशी विधाने अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद आहेत. तर दुसरीकडे गोव्यातील काँग्रेसचे नेते अमित पाटकर म्हणाले, की पणजीतील स्मार्ट सिटीबाबत २०१७ मध्ये त्यांनी केलेले आरोप आता खरे ठरले आहेत.