कळवण (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सप्टेंबर 2023 मध्ये मंत्रालयात झालेल्या आरोग्य विभागाच्या बैठकीत दिल्यानंतर राज्य सरकारच्या आरोग्य यंत्रणेने तातडीने पावले उचलली आहे. आरोग्य विभागाने उंबरठाण ग्रामीण रुग्णालयाला मंजुरी दिली असल्याची माहिती कळवण सुरगाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार नितीन पवार यांनी दिली.
सुरगाणा तालुक्यातील बालमृत्यु व कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यासाठी चांगली आरोग्य सुविधा येथील नागरिकांना मिळणे आवश्यक आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, उंबरठाण येथे ३० खाटांचे ग्रामिण रुग्णालय सुरु केल्यास कुपोषणाचे व बालमृत्युचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार असल्याचे आमदार नितीन पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सप्टेंबर २०२३ मध्ये झालेल्या बैठकीत निदर्शनास आणून देत सुरगाणा तालुक्यातील आरोग्य विभागाच्या अडचणी आणि समस्याचा पाढा वाचून लक्ष वेधले होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरोग्य विभागाच्या बैठकीत उंबरठाण प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्याचे निर्देश दिले होते. त्यांची अंमलबजावणी आरोग्य विभागाकडून करण्यात आली असून राज्य सरकारने परिपत्रकांद्वारे ग्रामीण रुग्णालयास मंजुरी दिली आहे. सुरगाणा तालुका पूर्णपणे आदिवासी व अतिदुर्गम तालुका असल्याने येथील गोर-गरीब रुग्णांना वैद्यकिय उपचारासाठी तालुक्याच्या ठिकाणी व वेळप्रसंगी जिल्ह्याच्या ठिकाणी उपचार घेण्यासाठी जावे लागत असल्यामुळे वेळ व आर्थिक नुकसान होत असल्यामुळे उंबरठाण परिसरातील आरोग्य सेवेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्यात आल्यामुळे या भागातील आरोग्य प्रश्न मार्गी लागणार असल्याचे आमदार नितीन पवार यांनी सांगितले.