कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संलग्नित २७ रुग्णालये असून येत्या काळात त्या सर्व रुग्णालयांमध्ये एम्स रुग्णालयाच्या धर्तीवर सुसज्ज सेवा देण्याचे काम विभागामार्फत करण्यात येणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्यक मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.
कोल्हापूर येथे धर्मदाय संघटना महाराष्ट्र राज्य व धर्मदाय सह आयुक्त कार्यालय कोल्हापूर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाआरोग्य शिबिरात उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ते म्हणाले त्यांनी गोरगरीब लोकांना मोफत उपचार देण्यासाठी धर्मदाय संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत महाआरोग्य शिबिर आयोजित केले आहे. हा प्रयोग राज्यात पहिल्यांदाच पाहायला मिळाला असून हा चांगला उपक्रम राज्यातील सर्व घटकांना आदर्श निर्माण करेल.
यावेळी त्यांनी राज्यात मोठ्या प्रमाणात धर्मदाय रुग्णालये असून त्यांच्याकडून सर्वसामान्य गोरगरिबांना शासनाच्या कायद्याप्रमाणे मोफत वैद्यकीय सेवांचा लाभ देणे आवश्यक आहे. धर्मदाय रुग्णालय तसेच सर्वच शासकीय-खाजगी रुग्णालयांनी प्रामाणिकपणे आरोग्य सेवा करून रुग्णांना मदत करणे काळाची गरज निर्माण झाली आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेसारख्या महत्त्वपूर्ण योजनेची अंमलबजावणी यशस्वीपणे करण्याची जबाबदारी सर्व आरोग्य यंत्रणेवर आहे. या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन आरोग्य मंत्री तानाजी सावंत व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी मंचावर धर्मदाय आयुक्त महेंद्र महाजन, खासदार धनंजय महाडिक, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळ कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, ताराराणी विद्यापीठ अध्यक्ष क्रांती कुमार पाटील, धर्मदाय सह आयुक्त कोल्हापूर विभाग निवेदिता पवार, कोल्हापूर बार आसोसिएशनचे अध्यक्ष ॲड.दीपक पाटील, सचिव ॲड.कीर्ती कुमार शेंडगे, धर्मदाय उपायुक्त कोल्हापूर कांचनगंगा सुपाते, सहाय्यक धर्मादाय आयुक्त शरद वाळके, अति.पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, धर्मदाय सह आयुक्त मुंबई रुबी मालवणकर, धर्मदाय उपायुक्त सांगली मनीष पवार, अधीक्षक शिवराज नाईकवाडे, अधीक्षक विशाल क्षीरसागर उपस्थित होते.