दत्ता भालेराव, नाशिक
नितांत सुंदर लक्षद्वीपचे पंतप्रधानांनी स्वतः भेट देऊन जगाचे लक्ष वेधले त्यासाठी मनःपूर्वक अभिनंदन. गेले काही वर्षांपासून मोदीजी देशांतर्गत पर्यटन वाढीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत. देशाच्या प्रमुखाने आपल्याच एखाद्या भुभागास भेट देऊन त्याचे कौतुक करणे यात गैर काहीच नव्हते. दक्षिण भारतातील केरळ राज्यातील कोची शहरापासून अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटे सुमारे २२०-४०० किलोमिटर आहेत. हा ३५ बेटांचा समूह असून केवळ १० बेटावर मानवी वस्ती आहे. या बेटांचा तळाशी समुद्रात पर्वतांची रांग लक्षद्वीप ते मालदीव अशी पसरली आहे. कवरत्ती हे शहर लक्षद्वीप ची राजधानी असून अगत्ती , कडमट, मिनिकोय ही बेटे प्रसिद्ध आहेत. येथे प्रामुख्याने मुस्लिम वस्ती आहे. येथे एक विमानतळ असला तरी सर्व वाहतूक कोची येथून सागरी मार्गाने चालते. लक्षद्वीपला जाण्यासाठी लक्षद्वीप प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते. अंदमानच्या तुलनेत लक्षद्वीप पर्यटनाच्या बाबतीत थोडे मागे राहिले आहे. पण सध्याच्या घडामोडीमुळे लक्षद्वीपने जगाचे लक्ष वेधले आहे. कारण मोदीजी यांनी लक्षद्वीपला दिलेली भेट हे निमित्त ठरले. त्यांनी लक्षद्वीपचे भरपूर कौतुक केले आणि छटाकभर मालदीवच्या तीन मंत्र्यांनी प्रथम यावर गरळ ओकली.
एक प्रकारे निसर्ग रम्य मालदीवच्या गळ्याला आणि स्वतःच्या पदाला नख लाऊन घेतले. त्यांना वाटले मोदीच्या या भेटीने मालदीवचे महत्व कमी होईल म्हणून त्यांनी समाज माध्यमावर काही आक्षेपार्ह विधाने केली किवा त्यांचेकडून करून घेतली गेली. अर्थात हा योगायोग नाही आणि ही कार्यावाही तोंड देखलीही असू शकते कारण हे प्रकरण दिसते तेवढे मालदीवचे नवीन अध्यक्ष मोहम्मद मुझ्झु सत्तेवर आल्यापासून त्यांचे भारताशी ब्रेक अप करून चीनशी जवळीक वाढून विविध सवलती आणि खैरात मिळवण्यासाठी त्यांचा आटापिटा चालू आहे. भारताला वाकुल्या दाखुन आणि ब्लॅकमेल करून चीन कडून जास्तीत जास्त सवलती पदरात पाडून घेण्यासाठी हा उपदव्याप असण्याची शक्यता आहे. मात्र असे असले तरी भारत आणि मालदीव मधील नागरिकांचे नाते जुने आणि घट्ट आहे. उद्या परत मुझ्झू जातील आणि भारताशी नाळ असलेले लोकप्रतिनिधी सत्तेवर येतीलही. म्हणून या सगळ्या गोष्टींकडे उघड्या डोळ्यांनी पाहणे जास्त योग्य आहे.
मालदीवची अर्थ व्यवस्था मुळातच पर्यटनावर अवलंबून आहे. दरवर्षी लाखो भारतीय मालदीवच्या तिजोरीत करोडो डॉलर ओततात , यावर भारत सरकारने कधीही बंधन आणले नाही. मात्र चीन सरकारने आपले चलन बाहेर जाऊ नये म्हणून विदेशी पर्यटनाला मोठ्या प्रमाणात बंधने आणली आहेत आणि त्यामुळेच थायलंड, श्रीलंका अश्या काही पर्यटनावर अवलंबून असलेल्या देशांनी विसा फ्री केला आहे. अश्या परिस्थितीत केवळ पर्याटनावर अवलंबून असलेला एखादा देश अचानक असे का वागतो याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. तसेच औषधपाण्या पासून तर सुरक्षा या सगळ्या गोष्टीवर भारताची नेहमी मदत घेणारा मालदीव असे का वागतोय हेही पाहायला हवे. सखोल माहिती न घेता तेथील पर्यटनावर बहिष्कार टाकून त्यांना धडा शिकवणे आपल्या हिताचे आहे का हेही बघितले पाहिजे. बुकिंग रद्द झाल्याचे आकडे किती खरे हेही महत्त्वाचे. कारण सोशल मीडियावर मालदीव वर बहिष्कार घाला असा मेसेज करणे सोपे आहे. पण हॉटेल सुरू असल्याने, विमाने रद्द झालेली नसल्याने त्यावर किती पर्यटक पाणी सोडतील हेही बघितले पाहिजे. तसेच यापूर्वी अनेक वर्षा पासून भारताने मालदीववर केलेला खर्च निळ्या समुद्रात सोडून द्यावा का? यामागे बारक्या डोळ्याच्या चीनचा कपटी डावही ओळखवास हवा.
या सर्व पार्श्वभूमीवर बहिष्काराचा गांभीर्याने विचार करावा. याच बरोबर हेही बघितले पाहिजे आज घडीला जगातील जवळ पास सर्व मोठे ब्रँड हॉटेल्स मालदीव मध्ये आहेत तर लक्ष द्वीप बेटावर तश्या सुविधा येण्यास वेळ लागणार आहे. पण अशक्य काहीही नाही. केंद्र सरकारने मनात आणले तर लक्षद्वीप मध्येही उत्तम हॉटेल्स अल्पावधीत उभे राहतील आणि जगभरातील पर्यटक लक्षद्वीपला येऊ शकतील. कारण दोन्ही ठिकानां मध्ये सर्वाधिक महत्वाची बाब म्हणजे मालदीव पेक्षा लक्षद्वीपचे निसर्ग सौंदर्य कणभर ही कमी नाही.
या सर्व प्रकारात चीनच्या दौरावर असलेले मुझ्झू यांचे झोळीत खरंच काय पडते, तोंड्याल मंत्री परत कधी येतात हे पाहणे आणि कुठलाही टोकाचा निर्णय घेण्यापेक्षा वेट अँड वॉच करावे हे सगळ्यात योग्य राहील. मात्र या सगळ्यात महत्वाचे म्हणजे दुसरीकडे जगभरातील मोठे हॉटेल ब्रांड्स लक्षद्वीप येथे येतील यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होणे गरजेचे आहे. शिवाय तिथे उद्या अंबानी , अडाणी इ. यांनी मोठी गुंतवणूक केल्यास आपलेच पोट दुखू नये. कारण काहीही असो पर्यटनात थोडा मागे असलेला हा भाग आत्ता लवकरच उकळून निघेल हे नक्की. कारण मागील काही वर्षात मोदिजिनी ज्या ज्या पर्यटन स्थळांना भेटी दिल्या तेथील पर्यटनास भरभराट आलेली आहे.
दत्ता भालेराव
ज्येष्ठ पर्यटन व्या
नाशिक.