नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -नाव यमुनाबाई. वय ७२ रा. नाशिक. गेल्या काही दिवसांपासून आजींना श्वसनाचा त्रास जाणवत होता. नातेवाईकांनी त्यांना बऱ्याच रुग्णालयामध्ये दाखल केले. आजींना हृदयाचा त्रास त्यात वय अधिक यामुळे त्यांच्यावर उपचार करणे हाय रिस्क असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यानंतर त्यांनी मुंबईत उपचारासाठी धाव घेतली. त्यानंतर त्यांना तावी शस्रक्रिया यावर पर्याय असल्याचे सांगण्यात आले. मात्र, मुंबईत असणाऱ्या किमती पाहून नातेवाईक आणखीनच संकटात आले. दरम्यान, एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये ही शस्रक्रिया होते असे समजल्यानंतर त्यांनी थेट एसएमबीटी हॉस्पिटल गाठले. अत्यंत गंभीर अवस्थेत असलेल्या वयोवृद्ध महिलेवर एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये ट्रान्सकॅथेटर आओर्टिक व्हॉल्व्ह इम्प्लान्टेशन (तावी) शस्रक्रिया यशस्वी करण्यात आली.
एसएमबीटी हॉस्पिटलच्या हृदयविकार विभागाचे संचालक आणि वरिष्ठ हृदयविकार तज्ञ डॉ. गौरव वर्मा व त्यांच्या टीमने ही शस्रक्रिया पार पाडली. या शस्त्रक्रियेला मिळालेले यश हे वैद्यकीय क्षेत्रातील महत्वाचा मैलाचा दगड असल्याचे डॉ वर्मा यांनी सांगितले. तावी शस्रक्रिया यशस्वी करणारे एसएमबीटी हॉस्पिटल उत्तर महाराष्ट्रात अग्रस्थानी असून कमीत कमी खर्चात या शस्रक्रिया याठिकाणी होऊ लागल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांची सोय झाली आहे.
अधिक माहिती अशी की, वयोवृद्ध महिला यमुनाबाई व्यवहारे, रा. नाशिक यांना शस्त्रक्रियेआधी महिनाभरापासून धाप लागणे, अशक्तपणा, अंधारी येणे, छातीत अस्वस्थ वाटणे आणि झोपेतून सतत जाग येणे अशी लक्षणे जाणवत होती. रुग्णाच्या कुटुंबीयांनी त्यांना नाशिकमधील अनेक हॉस्पिटल व मुंबईतही उपचारासाठी दाखल केले मात्र वय अधिक असल्याने डॉक्टर शस्रक्रीयेसाठी तयार होत नव्हते. यादरम्यान, त्यांनी नाशिकमध्ये त्यांच्या अनेक चाचण्या करून घेतल्या होत्या. त्यांच्या टू-डी एको कार्डिओग्राफीच्या रिपोर्टमध्ये त्यांना तीव्र स्वरूपाचे आओर्टिंक स्टेनोसिस असल्याचे निदान झाले.
या स्थितीमध्ये महारोहिणीच्या झडपेच्या झापा काही अडथळ्यामुळे नीट उघडत नाहीत. रक्तप्रवाहामध्ये आलेल्या या अडथळ्यामुळे हृदयास प्रचंड त्रास होत होता व यामुळे त्यांचे हृदय कमकुवत झाले होते. या सर्व लक्षणांना हृदयातील डावे नीलय निकामी होणे असेही म्हटले जाते असे डॉ वर्मा यांनी सांगितले.
शरीरात अपुरे रक्ताभिसरण होत असल्याने रुग्णाला कमी रक्तदाबाची समस्या निर्माण झाली होती. त्यांच्या किडन्यांवर विपरित परिणाम झाला होता. त्यांची तब्येत वेगाने ढासळत होती. अशा परिस्थितीत त्यांना पुढील उपचारांसाठी एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आओर्टिक व्हॉल्व्हमध्ये असलेल्या अडथळ्यामुळे आणि डावे नीलय निकामी झाल्याने फुफ्फुसामध्ये रक्त साठत असल्यामुळे याठिकाणी सूजही आली होती.
परिणामी, शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली होती आणि त्यांना प्रचंड धाप लागत होती. आओर्टिक स्टेनॉसिसची समस्या दूर करणे अत्यावश्यक असल्याने शरीराचा कमीत-कमी छेद घेऊन करण्यात येणारी तावी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉ वर्मा यांनी रुग्णाच्या कुटुंबियांना दिला. शस्रक्रीयेच्या आधी बरेच दिवस रुग्णालयात या महिलेला अॅडमिट ठेवण्यात आले. यादरम्यान महिलेच्या मानसिक स्वास्थावर याचा परिणाम होऊ नये यासाठी विशेष काळजी हॉस्पिटलमधील स्टाफने घेतली. आजीला दररोज भेटणे, ख्याली खुशाली विचारणे, विनोद तसेच गमती-जमती करून दवाखान्यात आहोत असे आजीला जाणवू दिले नाही.
दरम्यान, तावी शस्रक्रियेनंतर दोन दिवसांनी कायमस्वरूपी पेसमेकर बसविण्यात आला. दोन्ही शस्त्रक्रिया पूर्ण झाल्याबरोबर त्यांचे हृदय नीट काम करू लागले कारण आता नवीन व्हॉल्व्हमुळे हृदयाकडून पम्प होणारे रक्त विविध अवयवांपर्यंत पोहोचण्यास कोणताही अडथळा येत नसून आजीला पूर्वीप्रमाणे व्यवस्थित वाटणार असल्याचे डॉ. वर्मा यांनी सांगितले.
तावी शस्रक्रिया म्हणजे काय?
ओपन हार्ट सर्जरीला तावी शस्रक्रिया पर्याय आहे. ही अत्याधुनिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया आहे. रुग्णाच्या मांडीतून एक सुई टाकून कॅथेटरच्या साहाय्याने रक्तवाहिनीद्वारे खराब झडपेच्या जागेवर कृत्रिम झडप बसवली जाते.एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये अनुभवी आणि तज्ञ हृदयविकार तज्ञांची टीम आहे. याठिकाणी हृदयाच्या झडपांवर विशेष काम होत आहे. रुग्ण आमच्याकडे लवकरात लवकर दाखल झाल्यास त्यांना शस्त्रक्रियेविना अनेक वर्षे आयुष्य चांगल्या प्रकारे जगता येते. वेळीच योग्य मार्गदर्शन घेतल्यास योग्य ती शस्त्रक्रिया करून रुग्ण निरोगी जीवनाचा आनंद घेऊ शकतात. रुग्णाने शस्त्रक्रियेनंतर निष्काळजी न राहता वेळोवेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणेही तितकेच महत्वाचे आहे.
डॉ. गौरव वर्मा, संचालक व वरिष्ठ हृदयविकार तज्ञ, एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूट
मुंबईच्या तुलनेत स्वस्तात उपचार
माझ्या आईची तब्बेत खूप बिघडली होती. आम्ही तिला मुंबईमध्येही दाखल केले होते. मात्र, तिची तब्बेत सुधारली नाही. अनेक डॉक्टरांनी तर तिला घरी घेऊन जाण्याचा सल्ला दिला. यानंतर आम्ही तिला एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉ वर्मा यांनी आम्हा सर्व कुटुंबियांना आणि आमच्या आईला खूप धीर दिला. यानंतर आईच्या शस्रक्रियेसाठी सर्वजण तयार झालो आज आईला खूप बरे वाटते आहे. मुंबईच्या तुलनेत स्वस्तात उपचार देखील झाले यामुळे आर्थिक अडचणदेखील दूर झाली. आजी आता स्वतः व्यवस्थित बोलू शकते आहे, चालते आहे.
विजया वालझाडे, रुग्ण महिलेची मुलगी