कळवण (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कांदा निर्यातबंदी आणि शेतकरीविरोधी धोरणामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. केंद्र सरकारच्या या धोरणामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोदींच्या दौऱ्यावेळी आंदोलन करू नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. यासाठी कळवण पोलिसांनी कळवण तालुक्यातील शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देविदास पवार, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विलास रौदळ, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेवाळे आदी शेतकरी नेत्यांना नोटिसा बजावून त्यांना त्यांच्या घरी ताब्यात घेऊन नजरकैदेत ठेवले.
नवीबेज येथून शेकडो कांदा उत्पादक शेतकरी नाशिक येथे रवाना होणार असल्याचे पोलिसांना समजताच शेतकरी नेते देविदास पवार यांच्या निवासस्थानी पोलिसांनी धाव घेत जमलेल्या शेतकरी नेते व शेतकरी बांधवाना नोटीसा बजावत नजरकैदेत ठेवले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिक दौऱ्यावर आले. पण त्याआधीच कळवण तालुक्यातील शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी इशारा दिला होता की, पंतप्रधानांनी कांदा निर्यातबंदी रद्द करावी, अन्यथा आम्ही त्यांना विरोध करू. नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावेळी शेतकऱ्यांकडून कोणतेही आंदोलन होऊ नये, यासाठी कळवण पोलीस प्रशासनाने शेतकरी नेत्यांना नोटिसा बजावून त्यांना नजरकैदेत ठेवले.