कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – धर्मदाय रुग्णालयांमधून सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक आरोग्य सेवा चांगल्या प्रकारे मिळत नसल्याच्या नेहमीच तक्रारी शासनाकडे येत असतात. यासाठी रुग्णांना घरी बसूनच यापुढे धर्मदाय रुग्णालयातील आपले बेड मोबाईल ॲपच्या द्वारे आरक्षित करता येणार आहे. यासाठी मोबाईल ॲप सुरू करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून येत्या दिवाळीपूर्वी रुग्णांना याद्वारे कोणत्याही इच्छित धर्मदाय रुग्णालयात आपल्याला आवश्यक असलेली सेवा सहज घेता येणार आहे असे राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले.
कोल्हापूर येथे धर्मदाय संघटना महाराष्ट्र राज्य व धर्मदाय सह आयुक्त कार्यालय कोल्हापूर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाआरोग्य शिबिरात उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत
यावेळी आरोग्यमंत्री सावंत म्हणाले, शासकीय आरोग्य योजना तसेच धर्मदाय रुग्णालयातील मोफत आरोग्य सेवा याबाबतची माहिती देण्यासाठी प्रत्येक धर्मदाय रुग्णालयात त्यांच्याकडूनच नेमलेला कर्मचारी असतो. मात्र याबाबतची माहिती येणाऱ्या रुग्णांना योग्य प्रकारे दिली जात नसल्याने आता यापुढे आरोग्य विभागामार्फत नेमलेल्या आरोग्य दूताकडून संबंधित गरजू रुग्णांना आरोग्य सेवेबद्दलची माहिती दिली जाणार आहे.
शासनाकडून मोफत व आवश्यक आरोग्यसेवा देण्यासाठी येत्या काळात सनियंत्रण प्रणाली चांगल्या प्रकारे करणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
राज्य शासनाने आरोग्य विभागामार्फत घेतलेल्या ऐतिहासिक २२ निर्णयांबाबतची माहिती यावेळी आरोग्यमंत्री सावंत यांनी उपस्थितांना दिली. आरोग्य विभागा अंतर्गत येणाऱ्या दवाखान्यांमध्ये आवश्यक मनुष्यबळाची भरतीही येत्या काळात होणार आहे.
अपुऱ्या मनुष्यबळावरही राज्यातील आरोग्य सेवक चांगल्या प्रकारे काम करत असून येणारा अतिरिक्त ताण सहन करून गरजूंना आरोग्यसेवा दिल्याबद्दल त्यांनी आरोग्य विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे यावेळी अभिनंदन केले. मोफत उपचार योजना यामुळे आता राज्यात शासकीय दवाखान्यात ओपीडी वाढली आहे. क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण शासकीय आरोग्य सेवांचा लाभ घेत आहेत. आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा असून यामध्ये राज्यात कोणीही राजकारण न करता सर्वांनी मिळून ही सेवा चांगल्या प्रकारे लोकांना देण्यासाठी प्रयत्न करूया असे आवाहनही आरोग्य मंत्री सावंत यांनी यावेळी केले.
यावेळी धर्मदाय आयुक्त महेंद्र महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त केले. धर्मदाय सह आयुक्त कोल्हापूर निवेदिता पवार यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंदा शिंदे राशिवडेकर यांनी केले तर आभार ॲड.दीपक पाटील अध्यक्ष बार असोसिएशन यांनी मानले.
धर्मादाय सह आयुक्त कार्यालय कोल्हापूर विभाग, कोल्हापूर रिजन ट्रस्ट प्रॉक्टिशनर्स बार असोसिएशन व कोल्हापूर विभागातील सर्व धर्मादाय रुग्णालये यांचे संयुक्त विद्यमाने धर्मादाय संघटनेतर्फे ताराराणी विद्यापीठ व्ही.टी. पाटील हॉल, राजाराम रोड येथे आज सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत सर्व रोग निदान महा-आरोग्य शिबीराचे आयोजित करण्यात आले. या शिबीरामध्ये नेत्ररोग, दंतविकार, त्वचारोग, न्युरो, एचआयव्ही, ह्दयरोग, स्त्रीरोग, कॅन्सर, कान नाक घसा, ऑर्थोपेडिक, किडनी, होमिओपॅथिक, आयुर्वेदिक विभाग आदी सेवा मोफत उपलब्ध होणार आहेत. शिबीरामध्ये कोल्हपूर शहर आणि जिल्ह्यातील 18 हॉस्पिटल, सांगली 22 हॉस्पिटल, रत्नागिरी 5 हॉस्पिटल व सिंधुदूर्ग जिल्ह्यातील 3 हॉस्पिटल सहभागी झाले आहेत. कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली येथील आणि सिंधुदूर्ग येथील सर्व धर्मादाय रुग्णालयांचे पथक शिबीरात आरोग्य तपासणी करीत आहेत.