इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कराचीः मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याचे दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारा लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक सदस्य हाफिज अब्दुल सलाम भुट्टावीचा मृत्यू झाला आहे. संयुक्त राष्ट्रांनी भुतावी यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.
भुतावी हा हाफिज सईदच्या जवळचा होता. २९ मे २०२३ रोजी दहशतवादी हाफिज अब्दुल सलाम भुट्टावीचा मृत्यू झाला; परंतु संयुक्त राष्ट्रांनी आता अधिकृतपणे आपल्या वेबसाइटवर दुजोरा दिला. पंजाब प्रांतात पाकिस्तान सरकारच्या ताब्यात असताना त्याचा मृत्यू झाल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. पाकिस्तानातील मुरीदके येथे लष्कराचे मुख्यालय स्थापन करणारा भुट्टावी हा प्रतिबंधित दहशतवादी संघटना जमात-उद-दावा आणि मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा सहायक होता. जमात उद दावा ही लष्कर-ए-तोयबाची प्रमुख दहशतवादी संघटना आहे.
भुट्टावीच्या मृत्यूनंतर, जमातशी संबंधित एका व्यक्तीने सांगितले होते, की ७७ वर्षीय भुट्टावी दहशतवादी वित्तपुरवठा प्रकरणात ऑक्टोबर २०१९ पासून लाहोरपासून सुमारे साठ किलोमीटर अंतरावर असलेल्या शेखूपुरा जिल्हा कारागृहात कैद होता. २९ मे रोजी त्याला छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले; परंतु त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. हाफिज सईदला ताब्यात घेण्यात आले, तेव्हा भुतावीने किमान दोन वेळा लष्कर-ए-तोयबा आणि जमात-उद-दावाचा प्रमुख म्हणून काम केले. नोव्हेंबर २००८ च्या मुंबई हल्ल्यानंतर काही दिवसांनी सईदला ताब्यात घेण्यात आले आणि जून २००९ पर्यंत तो कोठडीत ठेवण्यात आला. भुतावीने या काळात दहशतवादी संघटनेच्या दैनंदिन कारवाया हाताळल्या आणि संघटनेच्या वतीने निर्णय घेतले.
संयुक्त राष्ट्राने त्यांच्या वेबसाइटवर अहवाल दिला आहे, की भुतावीने ऑपरेशन्सच्या गुणवत्तेवर व्याख्यान देऊन नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी कार्यकर्त्यांना तयार करण्यात मदत केली. मुंबई हल्ल्यात दीडशेहून अधिक लोक मारले गेले आणि अनेक जण जखमी झाले. लश्कर-ए-तोयबा आणि जमात-उद-दावाच्या मदरसा नेटवर्कसाठी भुतावी जबाबदार असल्याचे मानले जाते. २००२ च्या मध्यात, भुतावी पाकिस्तानातील लाहोरमध्ये लष्कर-ए-तोयबा या संघटनेची स्थापना करण्याचाही प्रभारी होता.