मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) बहुप्रतीक्षित मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या सोहळ्यावर शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे गटाने बहिष्कार टाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाला शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक आमदार, खासदारांना ऐनवेळी निमंत्रण दिले, तशीच त्यांची नावे कार्यक्रम पत्रिकेत नसल्याने ठाकरे गटाने बहिष्कारास्त्र बाहेर काढत नाराजी व्यक्त केली आहे.
शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू आज नागरिकांसाठी खुला होणार आहे. मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या या सोहळ्यासाठी ठाकरे गटाला ऐनवेळी निंमत्रण देण्यात आली. सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक आमदार, खासदारांची नावे नसल्याने ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. ऐनवेळी निमंत्रण पाठवल्याने तसेच निमंत्रण पत्रिकेत नामोल्लेख टाळल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यात आला आहे.
शासनाच्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत स्थानिक आमदार आणि खासदारांचे नाव असणे आवश्यक आहे. या पत्रिकेत राज्यपाल, केंद्रीय मंत्री, राज्यातील मंत्र्याची नावे आहेत. सुनील तटकरे आणि श्रीरंग बारणे या दोन्ही खासदारांची नावे असताना त्या ठिकाणचे स्थानिक खासदार अरविंद सावंत यांचे नाव नाही, हे शिवसेनेच्या ठाकरे गटाने निदर्शनास आणले आहे.