नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्वामी विवेकानंद यांच्या १६१ व्या जयंतीनिमित्त नाशिक येथे होणाऱ्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाला सुरुवात झाली आहे. या सोहळ्या अगोदर पंतप्रधान मोदी यांचा रोड शो झाला. त्यानंतर त्यांनी रामकुंडावर जलपूजन केले त्यानंतर काळाराम मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन केले. त्यानंतर ते युवा महोत्सवाच्या उदघाटनाला आले असून या महोत्सवाला सुरुवात झाली आहे.
१२ ते १६ जानेवारी पर्यंत हा सोहळा असून आज सकाळपासून युवा कला महोत्सव सुरु झाला आहे. भारताची क्रीडा क्षेत्रातील कामगिरी चमकदार आहे. राष्ट्रीय युवा महोत्सवातून भारतातील युवा शक्तीला ‘विकसित भारत @२०४७’ संकल्पना साकार करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी या महोत्सवाचे आयोजन केले आहे.
सकाळी स्वागत
सकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नवी दिल्ली येथून वायू दलाच्या खास विमानाने ओझर विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी स्वागत केले. यावेळी राज्याचे प्रधान सचिव नितीन करीर, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी प्रधानमंत्री यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.