इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
माझा नवरा कलेक्टर ऑफिस मध्ये असे सांगत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारीला शिवीगाळ व मारहाण करणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे तीची ही दादगिरी अंगलट आली आहे. दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा प्रकार घडला.
या ठिकाणी असलेले वैद्यकीय अधिकारी अविनाश आल्लमवार यांना माझा नवरा कलेक्टर ऑफिस मध्ये कामाला असल्याचे सांगत या महिलेने मारहाण केली. या घटनेत आमच्या पेशंटला सलाईन लाव, नाहीतर बघून घेईल अशी धमकी दिली. त्यानंतर शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची माहिती दौंड पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली.
प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अविनाश रामलु आल्लमवार हे प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करत असतांना ही माहिला आली. त्यानंतर हा प्रकार घडली. या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी अविनाश आल्लमवार यांनी दौंड पोलीस ठाण्यात दिल्यानंतर या महिलेवर अॅट्रॉसिटीसह सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव हे या घटनेचा अधिक तपास करत आहेत. राणी मुंडलीक असे या महिलेचे नाव असून ही घटना शनिवारी प्राथमिक आरोग्य केंद्रात घडली.