नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात होणाऱ्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उदघाटन होणार आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधानांचा रोड शो होणार असून ते काळाराम मंदिरात दर्शनही घेणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने युद्ध पातळीवर तयारी सुरू केली आहे. पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्रीय व राज्यातील मंत्री उपस्थितीत राहणार आहे.
नाशिक – छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील निलगिरी बाग मैदानात हेलिपॅड तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १०.३० आगमन होणार असून येथून ते तपोवन मैदानापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उदघाटन करण्यात येणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदी युवकांशी संवाद साधणार आहेत. नाशिक – छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील निलगिरी बाग ते तपोवन मैदानापर्यंत पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महानगरपालिकेने युवा महोत्सवासाठी युद्ध पातळीवर तयारी केली आहे. तपोवन परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे.
देशातील विविध कोनाकोपऱ्यातून सुमारे ७ हजार ५०० युवक सहभागी होणार आहेत. युवा महोत्सवात राज्यभरातून ३६०० युवक, २५०० स्वयंसेवक, ४०० आमंत्रित स्वयंसेवक आणि १००० युवक सहभागी होणार आहेत. कलेच्या सादरीकरणासह ५०० युवक आणि संशोधकांसाठी एक विशेष मंच दिला जाणार आहे. युवा महोत्सवासाठी १ लाख युवक सहभागी होणार असल्याची माहिती क्रीडा आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी उपस्थित पत्रकारांना दिली. या महोत्सवात १२ ते १६ जानेवारी दरम्यान शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.