मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राज्याच्या दौऱ्यावर येणार आहे. यावेळी ते ३० हजार ५०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमीपूजन करतील. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नमो महिला सशक्तीकरण अभियान सुरू केले जाणार आहे. महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन याद्वारे सक्षम केले जाणार आहे. नाशिकमध्ये २७ व्या युवा महोत्सवाचे उद्घाटनही प्रधानमंत्री करतील.नाशिकमध्ये १२ ते १६ जानेवारी दरम्यान आयोजित २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल. ‘Viksit Bharat@ 2047:युवा के लिए, युवा के द्वारा’ही यंदाच्या महोत्सवाची संकल्पना आहे.देशभरातले साडे ७ हजार युवक-युवती यात सहभागी होतील.
त्यानंतर प्रधानमंत्री मुंबईतल्या अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचं लोकार्पण करतील.याचं भूमीपूजनही डिसेंबर २०१६ मध्ये त्यांच्याच हस्ते झालं होतं. १७ हजार ८४० कोटी रुपये खर्च करून बांधलेला हा सुमारे २२ किलोमीटरचा ६ पदरी पूल आहे.त्यातला साडे १६ किलोमीटरचा भाग समुद्रात आणि साडे ५ किलोमीटर जमिनीवर आहे.हा देशातला आणि समुद्रावरचा सर्वात लांब पूल आहे.यामुळं मुंबई-पुणे,मुंबई-गोवा तसंच दक्षिण भारतात जाण्याच्या वेळेत बचत होईल. या पूलावरून प्रवास करून प्रधानमंत्री नवी मुंबईत जातील आणि १२ हजार ७०० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमीपूजन करतील. त्यात पूर्व मुक्त महामार्गालगत ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह दरम्यानच्या सव्वा ९ किलोमीटरच्या बोगद्याच्या भूमीपूजनाचा समावेश आहे.
पालघर आणि ठाणे जिल्ह्यातल्या १४ लाख नागरिकांना पिण्याचं पाणी पुरवणाऱ्या सुर्या प्रादेशिक पाणी पुरवठा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल.उरण-खारकोपर लोकलच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण प्रधानमंत्री करतील. यामुळं नेरूळ-बेलापूरहून खारकोपरपर्यंत धावणारी लोकल उरणपर्यंत धावेल.ठाणे आणि ऐरोली दरम्यानचं दिघा गाव रेल्वे स्थानक तसंच पश्चिम रेल्वेमार्गावरच्या खार रोड ते गोरेगाव दरम्यानच्या सहाव्या रेल्वेमार्गाचं लोकार्पणही उद्या प्रधानमंत्री करतील.सीप्झमधल्या भारत रत्नम या दागदागिने क्षेत्रासाठीच्या विशेष सुविधा क्षेत्राचं उद्घाटनही त्यांच्याहस्ते होणार आहे.