मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले राष्ट्रवादीचे नेते आ. नवाब मलिक यांच्या अंतरिम जामिनाला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. गेल्या वर्षी ११ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत अंतरिम जामीन मंजूर केला होता. किडनीचा त्रास कायम असल्याने जामिनाची मुदत वाढवण्यात आली होती.
मलिक यांना फेब्रुवारी २०२२ मध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू हजर झाल्यानंतर, न्यायमूर्ती बेला एम त्रिवेदी आणि न्यायमूर्ती पंकज मिथल यांच्या खंडपीठाने मलिक यांच्या अंतरिम जामिनाला मुदतवाढ दिली. यावर तपास यंत्रणेचा कोणताही आक्षेप नसल्याचे राजू म्हणाले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. मलिक यांनी १३ जुलै २०२३ च्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
न्यायालयाने यापूर्वी म्हटले होते, की मलिक किडनीच्या आजाराने त्रस्त असून गेल्या वर्षी ११ ऑगस्ट रोजी त्यांना दोन महिन्यांसाठी अंतरिम जामीन मिळाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झालेली नाही. फरारी माफिया दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांच्या कारवायांशी संबंधित कथित प्रकरणात ‘ईडी’ने फेब्रुवारी २०२२ मध्ये मलिक यांला अटक केली होती. मलिक यांचा दावा आहे, की त्यांना किडनीच्या गंभीर आजाराने ग्रासले आहे. मलिक यांनी किडनीच्या गंभीर आजारासोबतच इतर अनेक आजारांनी त्रस्त असल्याचा दावा करत उच्च न्यायालयात जामीन मंजूर करण्याची मागणी केली होती. गुणवत्तेवर जामीन देण्याची विनंती करणाऱ्या त्याच्या याचिकेवर दोन आठवड्यांनंतर सुनावणी होईल, असे उच्च न्यायालयाने म्हटले होते.