मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पेपरफुटीची वाढती प्रकरणे लक्षात घेता पारदर्शक पद्धतीनं परीक्षा घेण्यासाठी टी.सी.एस.आणि इतर कंपन्यांना देण्यात आलेली मुदतवाढ रद्द करुन पेपर फुटीचा आरोप होत असलेली सध्याची तलाठी पद भरती रद्द करावी अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
तलाठी पद भरतीची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करुन यापुढच्या सर्वच परीक्षा एम.पी.एस.सी.मार्फत घ्याव्यात. असेही त्यांनी म्हटले आहे. खाजगी आयटी कंपन्यांना नफा मिळवून देण्याचा सरकारचा उद्योग असून सरकारनं बेरोजगारांचं भवितव्य घोटाळेबाजांच्या दावणीला बांधल्याची टिकाही त्यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात केली आहे.
तरीही सरकार गंभीर नाही….
पेपरफुटीच्या रॅकेटमध्ये TCS कंपनीचे कंत्राटी कर्मचारी सहभागी असल्याची माहिती पुढे येत आहे.असल्याचे छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईतून पुढे आले आहे. टीसीएसने आऊटसोर्स केलेल्या खासगी सेंटरवरील १९ हून अधिक गुन्हे गेल्या वर्षभरात राज्यभर दाखल झाले आहेत. या सर्व गुन्ह्यांमध्ये किमान ९ आरोपी समान आहेत आणि त्यांची मोडस ऑपरेंटी सारखीच आहे. दहा लाखात तलाठी व्हा! थेट परीक्षा केंद्रात उत्तर पत्रिका मिळवा! अशा पद्धतीने उमेदवारांना अमिष दाखविले जात आहे.
परीक्षा सुरू होताच काही वेळात प्रश्नपत्रिका बाहेर येतात. या परीक्षेत उत्तरे पुरविण्यासाठी 3 लाख रूपये घेतले जातात. तळपायाला चिप लावून हिडन कॅमेऱ्याचा वापर करून प्रश्नपत्रिका स्कॅन केली जाते. हे सगळे प्रकार समोर आले आहेत. तरीही सरकार गंभीर नाही….