नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पोलिस असल्याची बतावणी करीत तोतयाने एका वृध्दास गाठून रोकडसह सोन्याची अंगठी हातोहात लांबविल्याचा प्रकार वर्दळीच्या सीबीएस भागात घडला. या घटनेत सुमारे ४५ हजार २०० रूपये किमतीचा ऐवज भामट्यांने लांबविला असून, याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक बहिरू कसबे (६४ रा.वडगाव ता.जि.नाशिक) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कसबे बुधवारी (दि.१०) कामानिमित्त शहरात आले होते. दुपारच्या शहरात ते परतीच्या प्रवासासाठी सिबीएस बसस्थानक परिसरात गेले असता ही घटना घडली. बसची प्रतिक्षा करीत ते स्थानकातील लॉटरी दुकानाजवळ बसलेले असतांना अनोळखी भामट्याने त्यांना गाठले. यावेळी पोलिस असल्याची बतावणी करीत भामट्याने त्यांना हातातील सोन्याची अंगठी काढून ठेवण्याच्या सल्ला दिला. तसेच मदतीचा बहाणा करीत संशयिताने अंगठीसह खिशातील रोकड हातोहात लांबविली. बसमध्ये बसल्यानंतर कसबे यांनी आपल्या ऐवजाची चाचपणी केली असता ही घटना उघडकीस आली. अधिक तपास हवालदार साबळे करीत आहेत.
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-पार्क केलेल्या कारमधून चोरट्यांनी लॅपटॉप बॅग चोरून नेल्याची घटना कॉलेजरोड भागात घडली. या बॅगेत रोकडसह महत्वाच्या कागदपत्र आणि अन्य ऐवज असा सुमारे ३७ हजाराचा ऐवज होता. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवेक प्रभाकर सम्मनवार (रा.बानेर पाषाण लिंकरोड,पुणे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. सम्मनवार मंगळवारी (दि.९) मित्र अभिषेक कुलकर्णी याच्या समवेत कामानिमित्त शहरात आले होते. कॉलेजरोड भागातील हॉटेल मझाली येथे कार पार्क करून दोघे मित्र हॉटेलमध्ये गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी कारचा दरवाजा कश्याने तरी उघडून लॅपटॉप बॅग चोरून नेली. या बॅगेत दोन हजार रूपयांच्या रोकडसह लॅपटॉप व मोबाईल चार्जर,एअरपॉड,एअरफोन तसेच महत्वाची कागदपत्र, क्रेडिट आणि डेबिट कार्ड असा सुमारे ३७ हजाराचा ऐवज होता. अधिक तपास हवालदार मोरे करीत आहेत.