नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया भागात झालेल्या दोन अपघातांमध्ये पादचारी वृध्देसह एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी गंगापूर आणि अंबड पोलिस ठाण्यात नोंदी करण्यात आल्या आहेत.
पहिला अपघात महामार्गाच्या सर्व्हीसरोडवर झाला. या अपघातात वसंत बाबुराव काटे या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. काटे गेल्या १९ डिसेंबर रोजी पाथर्डी फाट्याकडून मुंबईनाक्याच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. सर्व्हीस रोडने प्रवास करीत असतांना पुढे जाणाºया बोलेरो जीपला ओव्हरटेक करीत असतांना दुचाकीचे हॅण्डल जीपच्या पाठीमागील बाजूस लागले होते. त्यामुळे ते जमिनीवर पडले होते. या घटनेत त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू जाला. याबाबत जीप चालक विशाल चुंभळे (रा.गौळाणे ता.जि.नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मृत काटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार शेख करीत आहेत.
दुसरा अपघात औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात झाला. या अपघातात तुळसाबाई हिम्मतराव सोनवणे (७० रा.लकी पार्क,भवर टॉवरच्या मागे,शिवाजीनगर) या वृध्देचा मृत्यू झाला. सोनवणे या मंगळवारी (दि.९) भवर टॉवर समोरील रस्त्याने पायी जात असतांना भरधाव स्कूलबसने (एमएच १५ इएफ ०७३९) त्यांना जोरदार धडक दिली. या अपातात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी हिम्मत सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बसचालकाविरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक भिसे करीत आहेत.